लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. या बेकायदा बांधकामांवर ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे वाढल्या आहेत. निवडणूक कामामुळे बेकायदा बांधकामांकडे ढुंकुन न पाहणारे ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी कोपर भागातील उद्यान आरक्षणावरील एक बेकायदा इमारत तोडण्याची कारवाई लावली. तत्पूर्वीच त्यांनी हक्काची रजा घेऊन सुट्टीवर जाणे पसंत करत प्रभारी साहाय्यक आयुक्तांवर ढकलली आहे. यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे.

ह प्रभागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सावंत यांनी लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यात प्रभागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांकडे ढुंकून पाहिले नाही. आता ही बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू करण्याऐवजी बाहुबली नगरसेवकांचा रोष नको म्हणून ते हक्काची रजा टाकून रजेवर निघून गेल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.

आणखी वाचा-ठाणे : डम्परच्या धडकेत क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, अपघातात एका महिलेचाही सामावेश

कोपर प्रभाग, सखारामनगर गृहसंकल भागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे माफियांनी बांधली आहेत. सखाराम नगर गृहसंकुलाजवळील उद्यानाच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश एका न्यायिक यंत्रणेने साहाय्यक आयुक्त सावंत यांना दिले आहेत. सावंत यांनी कोपर मधील उद्यान आरक्षणावरील बेकायदा इमारत तोडण्याचा कार्यक्रम गुरूवारी लावला. तोडकामाची कारवाई करण्यापूर्वी सावंत यांनी रजा टाकून ही जबाबदारी प्रभारी साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्यावर ढकलल्याचे बोलले जात आहे.

ग प्रभागात असताना राजेश सावंत यांच्या काळात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले होते. अशा तक्रारी आता नागरिकांकडून करण्यात येत आहेत. ह प्रभागात अनेक बेकायदा बांधकामांच्या तक्रारी प्रलंबित आहेत. एकाही इमारतीवर सावंत यांनी कारवाई केलेली नाही, असे तक्रारदार विनोद जोशी, महेश निंबाळकर यांनी सांगितले. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांना सावंत यांची बेकायदा कारवाईतील टाळाटाळ दिसत नाही का, असे प्रश्न तक्रारदारांनी केले आहेत. सावंत हे शिवलिला इमारत तोडत नाहीत म्हणून ठाकुरवाडीतील धीरेंद्र भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अधिक माहितीसाठी साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना संपर्क केला. ते नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश मिळत होता. ह प्रभागाचे अधिक्षक अरूण पाटील यांनी कोपर भागातील एक इमारत जमीनदोस्त करण्याचा कार्यक्रम लावला असल्याचे सांगितले. सावंत यांच्या हालचालींवर वरिष्ठ नजर ठेऊन असल्याचे समजते.

आणखी वाचा-शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणतात, काहींनी जाहीरपणे नाही पण मैत्री निभावली; समाजमध्यमांवरील संदेशामुळे खळबळ

ह प्रभागातील बेकायदा बांधकामे

कोपरमधील चरू बामा म्हात्रे शाळेमागे बेकायदा इमारतीसाठी पाया खोदणे, जुनी डोंबिवलीत प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या दोन इमारती, राहुलनगरमध्ये सुदामा रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड, ठाकुरवाडीत शाळा आरक्षणावरील शिवलिला इमारत, कोपर रेल्वे स्थानकाजवळ शैलेश पाटील यांचा खुराडा, कुंभारखाणपाडा खंडोबा मंदिरासमोरील इमारत. गणेशनगर रेल्वे मैदानालगत बेकायदा इमारत.

कोपर भागातील एक अनधिकृत इमारत तोडण्याचा कार्यक्रम लावला आहे. यासंदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करण्यात येईल. -चंद्रकांत जगताप, प्रभारी साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hammer on illegal building on park reservation in kopar mrj