कल्याण- साथीचे आजार टाळण्यासाठी उघडयावरील पदार्थ खाऊ नका, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने केले आहे. शहरात उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाऱ्या सर्व प्रकारच्या हातगाड्या बंद राहतील यासाठी प्रभाग स्तरावरील साहाय्यक आयुक्त प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करुन डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात खाद्य पदार्थ विकणारे विक्रेते बिनधास्तपणे खाद्य पदार्थांची विक्री करत असल्याचे चित्र आहे.पाणी पुरी, वडापाव, मिसळ, दाबेली, डोसा सारख्या वस्तू हातगाडीच्या माध्यमातून विक्रेते बारही महिने विकत असतात. उघड्यावर तयार करुन विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पदार्थांवर माशा बसतात. इतर जीवजंतूंचा वावर असल्याने हे पदार्थ बाधित होतात. हे पदार्थ खाल्याने बाधा होईल याची जाणीव असुनही बहुतांशी नागरिक हे चटपटीत पदार्थ खाण्यास प्राधान्य देत आहेत.
मागील काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत बारही महिने सुरू असलेल्या हातगाड्यांच्या ठिकाणी सुरू असलेली उघड्यावरील खाद्य पदार्थांची विक्री मुसळधार पाऊस सुरू असताना विक्रेत्यांनी सुरू केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या, प्रभाग स्तरावरील कर्मचाऱ्यांना या हातगाड्या दिसत नाहीत का, असे प्रश्न जाणकार नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा >>>जैतापूर आणि नाणार या प्रकल्पांचा विरोध समजून घेणे आवश्यक; जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर
हेही वाचा >>>देशाबाबत वाईट गोष्टींना जास्त प्रसिद्धी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
कल्याणमध्ये मुरबाड रस्ता, मोहिंदरसिंग काबुलसिंग गल्ली, लालचौकी, बिर्ला महाविद्यालय रस्ता, पारनाका, कोळसेवाडी, कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसर, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयासमोरील रस्ता, पेंडसेनगर, मानपाडा रस्ता, पाथर्ली रस्ता, फुले रस्ता, गोपीनाथ चौक, गरीबाचापाडा, दिनदयाळ, कोपर रस्ता भागात या हातगाड्या सुरू आहेत. पालिका, खासगी दवाखाने ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. साथीचे आजार वाढत असताना उघ्डयावर खाद्य पदार्थ विकणारे विक्रेते प्रशासनाला दाद देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हातगाडी चालकांची पाठराखण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जागरुक नागरिकांकडून केली जात आहे.