‘पंखाविना भरारी’ पुस्तकाच्या अकराव्या आवृत्तीचे प्रकाशन
शारीरिक आणि मानसिकरीत्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींचे मन सामान्य व्यक्तींपेक्षा कणखर असते. जिद्द, चिकाटी आणि संयम या तीन गुणांचा आधार घेऊन या व्यक्ती आयुष्यभर जगत असतात. त्यांचे आयुष्य सामान्यांना प्रेरणादायी ठरते, असे मत ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी ‘पंखाविना भरारी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. ग्रंथाली आणि भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शरयू घाडी लिखित ‘पंखाविना भरारी’ पुस्तकाच्या अकाराव्या आवृत्तीचे प्रकाशन गुरुवारी किसननगर येथील महानगरपालिका शाळेत करण्यात आले.
स्नायू आणि मज्जातंतू या शरीरातील महत्त्वाच्या घटकांच्या कमतरतेमुळे शारीरिक अपंगत्व आलेल्या प्रसाद घाडी या मुलाच्या जीवनावरील कथा त्याची आई शरयू घाडी यांनी पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर मांडली आहे. शारीरिक अपंगत्व असूनही शिक्षण तसेच विविध कलांमध्ये पारंगत असलेल्या आणि बालश्री पुरस्कार विजेत्या प्रसादला घडवताना आलेले अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. पुस्तकाच्या रूपाने प्रसादचा पुनर्जन्म होत आहे, असे ‘पंखाविना भरारी’च्या लेखिका शरयू घाडी यांनी सांगितले.
प्रसादची कल्पनाशक्ती उत्तम होती. त्याच्या मनातील भावना चित्रात उमटत असत, असे सांगत प्रसादचे चित्रकलेचे शिक्षक दिगंबर चितकर यांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला. यशस्वी व्यक्ती संकटावर मात करत मोठय़ा झालेल्या असतात. सकारात्मक मानसिकता महत्त्वाची असते. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी आपले छंद उपयुक्त ठरतात. संयम आणि चिकाटी एकत्र असल्याशिवाय व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही, असे सांगत परब यांनी प्रसादच्या आयुष्याची तुलना खगोलशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्याशी केली. लहान मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संकटाला सामोरे जात आयुष्य जगणाऱ्या प्रसादच्या जीवनावरील पुस्तकातील काही परिच्छेद अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असेही मत परब यांनी कार्यक्रमात व्यक्त केले.
राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळालेली प्रसादच्या आयुष्यावरील चित्रफित कार्यक्रमात दाखवण्यात आली. छायाचित्रकार संजय पेठे, प्रसादचे शिक्षक दिगंबर चितकर, सूर्यकांत जाधव, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यावेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handicapped persons success always give inspiration