ठाणे : गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदान दोन दिवसांपूर्वी जमा केले असून त्यापाठोपाठ आता दिवाळीपूर्वी वेतनही बँक खात्यात जमा करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. पालिकेच्या वर्ग एकच्या अधिकाऱ्यांनी सानुग्रह अनुदानाची रक्कम घेतली नसल्यामुळे पालिकेच्या ७० लाखांची बचत झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर ७ हजार ५७८ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामध्ये महापालिकेचे ६५०९, शिक्षण विभागाचे ६९७, महापालिका कंत्राटी ७३, अनुकंपा ६६ आणि इतर २३३ कर्मचारी कार्यरत आहेत. तर पालिका परिवहन विभागात १५०० च्या आसपास कर्मचारी आहेत. याशिवाय कंत्राटदारामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २५०० च्या आसपास आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी २१५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदाच्यावर्षी त्यात २५०० रुपयांची वाढ करून ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४००० रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. यानंतर पालिका प्रशासनाने दिवाळीच्या आठ दिवस आधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्याची तयारी सुरु केली होती. यानुसार दोन दिवसांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम पालिकेने जमा केली आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर २१ ते २२ कोटींचा बोजा पडला आहे.

हेही वाचा – कल्याण पूर्व, पश्चिमेतील ठाकरे गटाचे उमेदवार ठरले, शिंदे शिवसेनेचे ठरेना

हेही वाचा – डोंबिवलीत पलावा येथे नायजेरीयन नागरिकाची पंधराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या

गेल्या काही वर्षांपासून पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. यामुळे पालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन वर्षांपूर्वी वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम घेऊ नका असा सल्ला दिला होता. त्यावेळी काहींनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, गेल्यावर्षी वर्ग एकच्या अधिकाऱ्यांनी बांगर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सानुग्रह अनुदान घेतले नव्हते. हिच परंपरा यंदा वर्ग एकच्या अधिकाऱ्यांनी कायम ठेवत सानुग्रह अनुदान घेतलेले नाही. यामुळे पालिकेच्या तिजोरीत ७० लाखांची बचत झाली आहे. सानुग्रह अनुदानापाठोपाठ आता दिवाळीपूर्वी वेतनही बँक खात्यात जमा करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.