डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यातर्फे रविवारी एमआयडीसीतील जीएनपी गॅलरी ते आर. आर. रुग्णालय रस्त्यावर हॅप्पी स्ट्रीटचे आयोजि करण्यात आले आहे. आठवड्यातून एक दिवस नोकरी, व्यवसायात व्यक्त असलेल्या रहिवाशांना रस्त्यावर आनंदी दिवस साजरा करता यावा. या माध्यमातून ताण-तणावातून मुक्तता व्हावी या उद्देशातून हा उपक्रम आयोजित केला आहे, असे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले.डोंबिवली एमआयडीसीतील जीएनपी गॅलरी (पेंढरकर महाविद्यालय) ते आर. आर. रुग्णालय दरम्यानच्या रस्त्यावर हा कार्यक्रम सकाळी सहा ते नऊ वेळेत होणार आहे.
हेही वाचा >>>ठाकुर्लीजवळ हैदराबाद एक्स्प्रेसच्या डब्याला आग
पोलीस, नागरिक यांच्यामध्ये जिव्हाळा, मैत्रीचे नाते निर्माण व्हावे या उद्देशातून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आदेशावरुन गेल्या वर्षापासून विविध पोलीस ठाणे हद्दीत दर रविवारी हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक रस्त्यावर विविध प्रकारची गाणी, नृत्य, झुंबा नृत्य, मौजमजा केली जाते. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, उद्योजक, कार्पोरेट, नोकरदार क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. नागरिक, विद्यार्थ्यांनी अधिक संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मानपाडा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.