ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विवियाना मॉल येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ बंद पाडल्यानंतर मनसेने मंगळवारी या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित केला होता. या खेळाला नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. गर्दीमुळे मनसेकडून तीन खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता. तसेच प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढले होते. या घटनेत एका प्रेक्षकाला मारहाणही झाली होती. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात आले. त्यांनी हा शो पुन्हा सुरू केला. मंगळवारी विवियाना मॉलमध्ये सायंकाळी ६.१५ वाजता मनसेने मोफत शो आयोजित केला होता. या चित्रपटाच्या शोला महिला आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सुरुवातीला दोन शोचे आयोजन करण्यात आले होते. गर्दी पाहून आणखी एका शोचे आयोजन करण्यात आले. गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ लागताच जाधव यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत स्वत: तिकिटांचे वाटप सुरू केले. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विवियाना मॉलमध्ये मनसेकडून मोफत खेळ
राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना मौन बाळगण्याची तंबी
मुंबई: ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू झालेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करु नका, असे स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखविला गेला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल ठाण्यात या चित्रपटाचे खेळ बंद पाडला होता. त्यानंतर आजही काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यावरून राष्ट्रवादी आणि मनसेत वाद संघर्ष सुरू झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यासह १०० जणांविरोधात गुन्हा; प्रेक्षकाला धक्काबुक्की, मारहाण प्रकरण
ठाणे : विवियाना मॉल येथील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ ते १० जणांनी पत्नीवर हात टाकण्याचा प्रयत्न केल्याने त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता ही मारहाण केल्याचे तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते ठाण्यातील पोखरण रोड भागात त्यांची पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री ते १० वाजता ‘हर हर महादेव’ हा चित्रपट पाहण्यासाठी पत्नीसह विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात आले होते. चित्रपट सुरू असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांनी चित्रपट बंद पाडला. तसेच प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर जाण्यास सांगितले. काही प्रेक्षक हे चित्रपटाच्या पडद्याजवळील भागात गेले आणि त्यांनी चित्रपट बंद करत असल्यास पैशांची मागणी केली. त्याच वेळी कोणीही येतो आणि चित्रपट बंद पाडतो असे एक प्रेक्षक म्हणाला. यामुळे गोंधळ उडाला. या वेळी काही जणांनी त्यांच्या पत्नीच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडविण्यासाठी गेलो असता आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आव्हाड आणि त्यांच्या १०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेक्षकांना केलेली मारहाण लांच्छनास्पद- अभिजीत देशपांडे
मुंबई : ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याने चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. ‘चित्रपटगृहात जाऊन ‘हर हर महादेव’ चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना झालेली मारहाण ही लांच्छनास्पद आहे. असे कृत्य करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी’, अशी मागणी त्यांनी केली. चित्रपटाबद्दल काही आक्षेप असतील तर ते चर्चेने सोडवले जाऊ शकतात, मात्र प्रेक्षकांना मारहाण करणे चुकीचे असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. या चित्रपटात महाराजांना सुरुवातीला असलेला बाजीप्रभूंचा विरोध आणि त्यांच्यात झालेले छोटेखानी युद्ध पाहायला मिळते. याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही, असे आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र हा प्रसंग आम्ही केळूस्कर यांच्या पुस्तकात जसा लिहिला आहे तसाच्या तसा घेतला आहे, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर चुकीचा जाणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासातील अनेक प्रवाहांचा, विचारांचा अभ्यास करून, संदर्भ घेऊन चित्रपटाची निर्मिती केली आहे.
– झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्स