डोंबिवली – बकरी पालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून २० लाख रूपये आणत नाही म्हणून डोंबिवलीतील एका विवाहितेचा तिच्या सासरच्या सासू, सासरे आणि पती यांनी छळ केला असल्याची तक्रार विवाहितेने रामनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीच्याअनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील बेकायदा राधाई इमारत भुईसपाट

ऋषीराज धनराज मोरे (पती), धनराज मोरे (सासरे), रुचिरा धनराज मोरे (सासु) अशी गुन्हा दाखल कुटुंबीयांची नावे आहेत. अक्षता मोरे असे पीडित विवाहितेचे नाव आहे. त्या उच्चशिक्षित आहेत. खेड तालुक्यात त्यांचे माहेर आहे. विवाहानंतर त्या डोंबिवलीत पतीसोबत राहत होत्या. जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत हा छळवणुकीचा प्रकार सासरच्या मंडळींनी केला आहे. पोलिसांनी सांगितले, मूळच्या कोकणातील असलेल्या तक्रारदार विवाहिता या विवाहानंतर डोंबिवलीत सासरी आल्या होत्या.

हेही वाचा >>> ठाणे : जिल्ह्यातील सीसीटीव्हीची प्रतिक्षाच

मागील दोन वर्षापासून विवाहिता अक्षता यांना पती, सासु, सासरे आपल्याला बकरी पालनाचा व्यवसाय करायचा आहे. यासाठी तू तुझ्या माहेरहून २० लाख रूपये घेऊन ये म्हणून तगादा लावत होते. हे पैसे तक्रारदार महिला आणत नसल्याने सासरची मंडळी तिला शिवीगाळ, अपशब्द वापरून शारीरिक, मानसिक त्रास देत होते. मुला ऐवजी मुलीला जन्म दिला म्हणून तिला टोमणे मारण्यात येत होते. घरातील या सगळ्या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार केली तर पुन्हा सासरी नांदावयास आणणार नाही अशी धमकी सासरच्या मंडळींकडून तक्रारदार महिलेला देण्यात येत होती. सासरच्या मंडळींचा त्रास वाढू लागल्याने अखेर पीडितेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक कावळे तपास करत आहेत.

Story img Loader