वेदिका कंटे, लोकसत्ता
ठाणे – एकीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक तास श्रमदानातून स्वच्छता अभियान एका दिवसापुरते राबविण्यात आले असतानाच, दुसरीकडे मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील हरीभाऊ वाघ हे गेल्या २५ वर्षांपासून परिसरात असे स्वच्छता अभियान राबवित असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही मोबदलाविना ते दररोज रात्री चार तास संपुर्ण म्हसा नाका साफ करतात. गाव स्वच्छ असावे या उद्देशातून ते हे काम करीत आहेत.
हेही वाचा >>> उरणमध्ये स्वच्छता अभियानाचा एक दिवस एक तासा पुरताच ठरला; गांधी जयंतीला पुन्हा कचरा रस्त्यावरच
सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनवण्यासाठी सरकारतर्फे ‘एक तारीख एक तास स्वच्छता’ मोहिम रविवारी राबविण्यात आली. या मोहिमेत राजकीय नेत्यांसह कार्यकर्ते आणि नागरिक सामील झाले. या उपक्रमामुळे अनेक परिसर स्वच्छ झाले. दुसऱ्यादिवशी अनेक ठिकाणी पुन्हा कचरा पडल्याचे दिसून आले. परंतु मुरबाड तालुक्यातील म्हसा भागात हे अभियान दररोज राबविले जात आहे. येथील हरीभाऊ वाघ हे गेल्या २५ वर्षांपासून स्वच्छता अभियान राबवित आहेत. ते दिवसभर किराणा दुकानात काम करतात. आपले काम आटोपून ते रात्री दहाच्या सुमारास म्हसा नाक्यावरील संपुर्ण रस्ते स्वत: झाडूने साफ करतात. म्हसा नाका हा मुरबाड, कर्जत, धसई या दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडतो. या नाक्यावर खाद्यपदर्थांची अनेक दुकाने आहेत. येथे दर रविवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे याठिकाणी कचरा निर्माण होतो. हा कचरा तसाच राहून नाका अस्वच्छ दिसतो. यामुळेच हरिभाऊ हे दररोज रात्री याठिकाणी साफसफाई करतात. या कामात त्यांना कोणीही मदत करत नाही. ते एकटेच हे काम करतात.
हेही वाचा >>> भंडार्ली कचराभूमीचा वाद पेटला; मनसे आमदारासह ग्रामस्थांनी घेतली आयुक्तांची भेट
प्रतिक्रिया
हरीभाऊ हे रोजचा कामाचा भाग असल्याप्रमाणे रात्री संपुर्ण म्हसा नाका साफ करत असतात. म्हसा नाका स्वच्छ असण्यामागे हरीभाऊ यांची रोजची मेहनत आहे. – वसंत कुर्ले, रहिवासी
आपण राहत असणारे ठिकाण हे स्वच्छ, सुंदर असावे याच उद्देशाने हे कार्य करतो. – हरीभाऊ वाघ