गाण्याची मैफलीतील गायक-गायिका यांच्याविषयी रसिकांना माहिती असते, परंतु साथसंगत करणाऱ्या कलावंतांची तितकीशी ओळख नसते. हार्मोनियमवादक आणि संगीतकार अनंत जोशी हे त्यापैकी एक व्यक्तिमत्त्व म्हणता येईल. ठाण्यात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणारे अनंत जोशी हे नियमितपणे मैफली अनुभवणाऱ्या रसिक श्रोत्यांना नक्कीच माहीत आहेत. मूळचे बदलापूरचे असलेले अनंत जोशी यांनी वडील आणि गायक पं. अच्युत जोशी यांच्याकडेच हार्मोनिमयवादनाचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर पं. विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडे पुढचे शिक्षण घेतले. संगीतातील विद्यापीठ म्हणता येतील असे दिवंगत संगीतकार श्रीनिवास खळे यांचा सहवास लाभल्याने अनंत जोशी यांना खूप शिकायला मिळाले. म्हणूनच आज जुन्या नाटय़पदांना नव्या चाली लावून त्याचे कार्यक्रम सादर करणे त्यांना शक्य झाल्याचे ते सांगतात. इयत्ता नववीत शिकत असल्यापासून अनंत जोशी कार्यक्रमांमध्ये साथसंगत करीत आहेत. आपल्या ‘व्हर्टिकल नोट्स’ या संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. येत्या रविवारी सकाळी ९.३० वाजता ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात ‘रागरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले आहे. निषाद बाक्रे यांचे गायन आणि पं. भाई गायतोंडे यांचे एकल तबलावादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. शास्त्रीय संगीतातील जवळपास सर्वच दिग्गज गायक-गायिकांच्या मैफलीत त्यांनी साथसंगत केली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या हार्मोनियमविषयक संशोधनासाठी फेलोशिप मिळविणारे ते पहिले कलावंत आहेत.
मराठी चित्रपटातील आवडती गाणी – ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’, ‘येणार नाथ आता’, ‘विकत घेतला श्याम’
आवडतं हिंदी चित्रपटातली गाणी – ‘आयेगा आनेवाला’, ‘पिया बिना पिया बिना’, ‘काश्मीर की कली हू मैं’
आवडते संगीतकार – श्रीनिवास खळे, मदन मोहन, आर. डी. बर्मन, सुधीर फडके
आवडती नाटय़पदं – ‘नयन लाजवीत..’, ‘संगीत रस सुरस’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा ’
आवडते शास्त्रीय गायक – पं. भीमसेन जोशी, ओंकार दादरकर म्
आवडत्या शास्त्रीय गायिका – किशोरीताई आमोणकर, कल्याणी साळुंके
आवडता खाद्यपदार्थ – आमटी भात
आवडतं हॉटेल – ठाण्यातील ‘शेल्टर’
ठाण्याविषयी थोडेसे – मूळचा बदलापूरचा असलो तरी १४-१५ वर्षांपासून ठाण्यात राहायला आलो तेव्हापासून ठाणेकरच झालो असे म्हणायला हरकत नाही. ‘व्हर्टिकल नोट्स’ ही संस्था सुरू करण्याच्या तीन वर्षे आधी ‘युनिटी’ या दोन-तीन दिवसांच्या कार्यक्रमाची रचना केली. शास्त्रीय संगीतातील ठाणेकर गायक-वादक कलावंतांचा एकत्रित कार्यक्रम अशी ही संकल्पना तयार केली. मोठी नवलाईची गोष्ट म्हणजे मी बीज रोवले असले तरी गेल्या तीन वर्षांपासून ठाण्यातील तब्बल ५० कलावंत अतिशय आपुलकीने, प्रेमाने या कार्यक्रमात सहभाग घेत असून रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. ठाणेकर रसिकांची अलौकिक दाद आणि ठाण्यात असलेली शास्त्रीय संगीतातील तसेच अन्या कला क्षेत्रातील कलाकारांची मांदियाळी हेच ठाण्याचे वैभव म्हटले पाहिजे. नाटय़पदांवर आधारित ‘नवनाटय़धारा’, शास्त्रीय संगीतातील सहा दिग्गजांनी गायलेल्या सुगम संगीतावरचा ‘भिन्न षड्ज’ असे कार्यक्रम आपण सादर करतो तेव्हा ठाणेकर रसिकांची अलौकीक दाद मिळते, वाहवा मिळते. संगीतावर प्रेम करणारे ठाणेकर रसिक आहेत. त्यामुळेच इथे राहायला आवडते.
किस्सा – ग्वाल्हेर-जयपूर घराण्याचे गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या मैफलीत त्यांना साथसंगत करायला मिळाली तो पहिला कार्यक्रम हा माझ्या कारकीर्दीतील संस्मरणीय क्षण म्हणता येईल. वांद्रे येथील शारदा संगीत विद्यालयात तो सादर करत असताना पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्यावर साथसंगत केली होती. दोन्ही दिग्गजांबरोबर संधी मिळाली हे माझे भाग्य. त्यानंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या घरी पं. कशाळकर यांच्या गायनाच्या मैफलीतही साथ करायला मिळाली तेव्हा तबलावादक पं. विजय घाटे यांची सोबत मिळाली हाही संस्मरणीय कार्यक्रम होता. या मैफलीला पं. शिवकुमार शर्मा, देवकी पंडित, सुरेश वाडकर यांच्यासारखे कलावंत उपस्थित होते.