अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील वडवली भागात राहणाऱ्या हर्षद परदेशी या तरुणाने लष्करातील लेफ्टनंट या पदासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. ‘युपीएससी सीडीएस’ ( कंबाईन डिफेन्स सर्व्हिस) या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने हर्षदची डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली असून त्यानंतर तो लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहे. स्वअध्ययनातून मिळवलेल्या या यशाबद्दल अंबरनाथमधून हर्षदचे कौतुक होते आहे.

हर्षद परदेशी याचे शालेय शिक्षण बदलापूर येथील एका खाजगी शाळेत झाले. दहावीत ९० टक्के गुण मिळाल्यानंतर औरंगाबाद येथून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या हर्षदने रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. कोणत्याही खासगी शिकवणीत प्रवेश ना घेता स्वतः अभ्यास करून हर्षदने ‘युपीएससी-सीडीएस’ परीक्षा देत त्यात यश मिळवले. या स्पर्धा परीक्षेत त्याचा भारतातून १२१ वा क्रमांक आला आहे. त्यामुळे त्याची डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अँकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली असून १८ महिने प्रशिक्षण घेऊन तो भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून तो रूजू होईल.

हेही वाचा >>>ठाण्यात विज्ञान केंद्र स्थापण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नावीन्यता उपक्रम केंद्र

लष्करात सेवा करण्याचे स्वप्न होते मात्र राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये प्रवेश न मिळाल्याने युपीएससी-सीडीएस परीक्षेची तयारी सुरू केली. अंबरनाथ नगर पालिकेच्या अभ्यासिकेची यात फायदा झाला. त्यामुळेच लष्करात जाण्याची संधी मिळाल्याचे हर्षदने बोलताना सांगितले. अंबरनाथ पालिकेने वडवली विभागात उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासिकेचा उपयोग झाला. तिथे एकाग्रचित्ताने अभ्यास करता आल्याचे हर्षदने सांगितले.

Story img Loader