कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्त पदावर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची प्रभारी आयुक्त म्हणून शासनाने नेमणुक केली आहे. या पदावर कायमस्वरुपी शासन नियुक्त आयुक्त येत नाही तोपर्यंत अतिरिक्त आयुक्त गायकवाड यांना प्रशासनाचा गाडा चालवावा लागणार आहे.

मागील दीड वर्षापासून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड कल्याण डोंबिवली पालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची पालघर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या मावळत्या आयुक्त डाॅ. जाखड यांनी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे सोपविण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशिला पवार यांनी काढले आहेत.अतिरिक्त आयुक्त गायकवाड यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागासह अनेक महत्वाचे विभाग आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. या बेकायदा इमारतींमध्ये सुमारे सहा ते सात हजार रहिवासी राहत आहेत. पालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई करायची आहे.

अशा सगळ्या तप्त वातावरणात कोणीही नवखा अधिकारी कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त म्हणून येण्यास तयार नसल्याचे समजते. तसेच, एका लोकप्रतिनिधी आणि त्याच्या स्वीय साहाय्यकाच्या वाढत्या हस्तक्षेपाची जाणीव असल्याने त्या दबावाखाली काम करण्याची अनेक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची इच्छा नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेत कोणीही आयएएस अधिकारी येण्यास तयार नसल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्या सारखा अधिकारी कल्याण डोंबिवलीत पाठविण्याची नागरिकांची मागणी आहे.