घरातील चौदा जणांची हत्या करून स्वत: आत्महत्या करणाऱ्या हसनैन वरेकर याच्या डोक्यावर सुमारे ६८ लाखांचे कर्ज असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे त्याच्यावर इतके कर्ज झाले असावे, असा संशय पोलिसांना आहे. यामुळे त्याच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीची सविस्तर माहिती जमा करण्यात येत आहे. असे असले तरी कर्जबाजारीपणातून त्याने हे हत्याकांड केल्याचे अद्याप तरी तपासात स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती ठाण्याचे सह पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी दिली. यामुळे हत्याकांडाचे गूढ अद्याप कायम आहे.
कासारवडवली गावातील हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या हत्याकांडाचा विविध अंगांनी तपास सुरू असताना हसनैनच्या डोक्यावर सुमारे ६८ लाखांचे कर्ज असल्याची बाब पुढे आली आहे. कासारवडवली गावात हसनैनच्या आईचे वडील गुलजार वरेकर हे राहत असून त्यांच्याकडून हसनैन याने दहा लाख रुपये घेतले होते. तसेच दोन मावश्यांकडूनही त्याने सुमारे ३५ लाख रुपये घेतले होते. याशिवाय, घरातील सोने गहाण ठेवूनही त्याने बँकेकडून कर्ज घेतले होते. असे एकूण ६८ लाखांचे कर्ज त्याच्यावर होते, मात्र त्याच्यावर इतके कर्ज कसे झाले, याविषयी स्पष्ट होऊ शकलेले नाही. असे असले तरी शेअर बाजारामधील गुंतवणुकीत मोठा आर्थिक फटका बसल्यानेच त्याच्या डोक्यावर इतके कर्ज झाले असावे, असा संशय आहे.
हसनैनच्या कर्जाचा तपशील जरी मिळाला असला तरी कर्जबाजारीपणातून त्याने हे हत्याकांड केल्याचे अद्याप तरी स्पष्ट होऊ शकलेले नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

Story img Loader