शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेकदा वाद झाला आहे. याआधी ठाण्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवर आले होते. यावेळी त्यांनी शाखेचं कुलूप तोडून शाखा ताब्यात घेतली आहे. हा प्रकार घडल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ५० खोक्यांवरून शिंदे गटातील नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली.
ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना सांगितलं, “ही शाखा गेली ३५ वर्षे शिवाईनगरमध्ये कार्यरत आहे. त्या शाखेवर कोणत्या तरी व्यक्तीने अनधिकृतपणे कुलूप तोडून ताबा घेतला आहे. माझं म्हणणं एकच आहे, कुलूप तोडून अशाप्रकारे ताबा घेण्याचा कायदा असेल तर तो कायदा आम्हाला दाखवा. त्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर असेल तर ती ऑर्डर आम्हाला दाखवावी. ते अशाप्रकारे ताबा घेऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत शाखेवर ताबा घेण्याचा त्यांना कुणालाही अधिकार नाही.”