डोंबिवली – डोंबिवली पूर्व एमआयडीसीत घारडा सर्कल येथे शहराच्या मुख्य प्रवेशव्दारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घाईतघाईत उभारण्याची जोरदार तयारी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. घारडा सर्कल वाहतूक बेटाच्या (आयलॅन्ड) मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्यासाठी शासनाच्या महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत अनुदानातून मिळालेला एक कोटी ४४ लाख ९९ हजार ५५२ रूपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे.
मागील वर्षी या अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामासाठी आवश्यक प्रक्रिया करून पालिकेने या कामाचे आदेश दिले. मुंबईतील बांद्रा येथील मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पुतळा उभारणीचे काम देण्यात आले आहे. आयुक्त, लेखा विभागाला हा प्रस्ताव माहितीस्तव सादर करण्यात आला आहे.
दीड वर्षापूर्वी एमआयडीसीतील घरडा सर्कल येथील सीमेंंट काँक्रीटचा रस्ता अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब करून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता. या रस्त्याच्या काही भागाची तोडफोड करून घरडा सर्कलचे वाहतूक बेट (आयलॅन्ड) तोडून पुतळा उभारणीचे काम जाळ्या लावून सुरू करण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावर घरडा सर्कल येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्याची पूर्तता आता केली जात आहे. या पुतळ्याची उभारणी, चबुतरा यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या घेण्याची कामे ठेकेदार, पालिकेकडून सुरू आहेत, असे शहर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहन कोंडीकडे दुर्लक्ष
घरडा सर्कल येथून विविध भागातून वाहनांचा ओघ असतो. शहराच्या प्रवेशद्वारावरील वाहनांची ही वाढती आणि भविष्यात वाढणारी वाहन संख्या विचारात घेऊन घारड सर्कलच्या वाहतूक बेटाचा आकार कमी करण्याचा किंवा ते काढून टाकण्याच्या दृष्टीने विचार करावा, अशी मागणी कोळसेवाडी वाहतूक विभागाने दोन वर्षापूर्वी पालिकेकडे केली आहे. त्याचा विचार न करता या जागेत आता शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याला आमचा विरोध नाही. पुतळा घारडा सर्कलजवळील कॅ. सचान स्मारकाजवळील सावळाराम महाराज क्रीडासंंकुलाच्या मोकळ्या जागेत उभारण्याची डोंबिवलीतील अनेक नागरिकांची मागणी आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याची खंत अनेक जाणत्यांनी व्यक्त केली.
अत्यावश्यक मंजुरीच्या प्रक्रिया पार पाडून घारडा सर्कल येथे अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. शासनाच्या विविध विभागाच्या आवश्यक परवानग्या घेण्यात येत आहेत. शासनाच्या मुलभूत सुविधा अनुदानातून हे काम केले जात आहे. – अनिता परदेशी, शहर अभियंता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीच्या प्रवेशव्दारावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. त्याची पूर्तता आता केली जात आहे. येत्या १७ मार्च रोजी शिवजयंती दिनी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. – राजेश मोरे, आमदार, कल्याण ग्रामीण.