किन्नरी जाधव
दिवाळीचे स्वरूप कितीही आधुनिक झाले असले तरी, त्याला लाभलेले परंपरेचे कोंदण कायम आहे. त्यामुळेच सणात नावीन्य स्वीकारतानाच जुन्या रूढींना सहसा तिलांजली दिली जात नाही. सिंधी समाजातील हथेडी दिव्यांची परंपराही अशीच. दिवाळीत पूजेसाठी महत्त्वपूर्ण मानले जाणारे फुलदाणीच्या आकाराचे शेणामातीचे हथेडी दिवे बाजारात सहज मिळत नाहीत. मात्र कोपरीतील काही सिंधी व्यावसायिक गेल्या ६० वर्षांपासून हे दिवे बनवत असून त्यांच्याकडील दिवे खरेदी करण्यासाठी अगदी मुंबई, नवी मुंबईतूनही सिंधी बांधव येत असतात.
सिंधीवासीयांच्या कुटुंबात दसरा आणि दिवाळीच्या सणात हथेडी दिव्यांची पूजा करून घरच्या घरी लहान मुलांसाठी व्यवसायाचे स्वरूप दाखवणारी एक प्रथा केली जाते. फुलदाणीच्या आकारात असलेले हे मोठे दिवे पेटवण्यात येत नाहीत. ताटासारख्या या दिव्यांमध्ये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून काही वस्तू ठेवण्यात येतात. कुटुंबातील लहान सदस्य एक किंवा दोन रुपयांची नाणी देत या वस्तू ज्येष्ठ सदस्यांकडून खरेदी करतात. दरवर्षी दिवाळीच्या सणात ही पारंपरिक प्रथा करण्यासाठी या हथेडी दिव्यांची आवश्यकता भासते. लहानपणापासूनच मुलांना व्यवसायाची कल्पना यावी यासाठी ही प्रथा अनेक कुटुंबात केली जाते, असे सिंधीवासीय सीमा वाढवा यांनी सांगितले.
पूर्वी केवळ माती आणि शेणाचे दिवेच या परंपरेसाठी वापरले जात होते. मात्र अलीकडच्या काळात स्टीलचे ताट किंवा स्टीलचे दिवे वापरण्यास सुरुवात केल्याने माती-शेणाचे दिवे तयार करण्याकडे व्यावसायिकांचा जास्त कल नसतो. मात्र गेली ६० वर्षे कोपरीत राहणारे काही सिंधीवासीय सणाच्या एक महिना पूर्वीपासूनच हे माती-शेणाचे दिवे तयार करण्यासाठी घेतात. आजही काही नागरिकांना माती आणि शेणाने तयार केलेल्या या दिव्यांचे आकर्षण असल्याने घाटकोपर, विक्रोळी, नवी मुंबई येथून नागरिक हे दिवे खरेदी करण्यासाठी कोपरीच्या बाजारात येत असल्याचे कोपरीतील व्यावसायिकांनी सांगितले.
‘हथेडी’ दिवेनिर्मितीचे कौशल्य
* हथेडी दिवे बनवण्यासाठी महिनाभर आधीच वेगवेगळ्या ठिकाणाहून माती आणि गाय, म्हशी किंवा घोडय़ांचे शेण गोळा केले जाते.
* सुरुवातीला या दिव्यांचे पाय तयार केले जातात. त्यानंतर या पायांवर गोल ताट तयार करण्यात येऊन या ताटावर मोठय़ा काठय़ा बसवण्यात येतात.
* पूर्ण दिवा तयार झाल्यावर ते उन्हात सुकवण्यात येतात. हा एक दिवा ५० रुपयांना विकण्यात येतो, अशी माहिती या दिव्यांची विक्री करणारे राहुल माळी यांनी दिली.