ठाणे : सगळीकडे सध्या अगदी भयकारी अवस्था आहे. समाजातील सर्व घटकांचे सुमारीकरण सुरू असून बुद्धिवाद्यांचा तिरस्कार केला जात आहे. हे चित्र चिंताजनक आहे. यामुळे अशा काळात साहित्यिकांनी स्वत्व जपत विशिष्ट भूमिका घेऊन लिखाण करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले
ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार यांना ‘पॉप्युलर प्रकाशन’ आणि ‘वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधी’ यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार देण्यात आला. ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयात हा पुरस्कार सोहळा पार पडला. सोहळय़ाला ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, ज्येष्ठ समीक्षिका मीना गोखले उपस्थित होत्या. भारतीयत्वाचे वैशिष्टय़च धोक्यात -डॉ. प्रज्ञा पवार
भारतीयत्वाचे प्रमुख वैशिष्टय़ असलेले विविधतेतून एकता हेच सध्या धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या सगळय़ांना एकाच रंगात रंगविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांविरुद्ध मांडलेली भूमिका अनेकदा काही जणांना आवडत नाही, असे डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी सांगितले.