बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची पिण्याच्या पाण्यासाठी जीवन वाहिनी असलेल्या उल्हास नदीला प्रदूषणाने ग्रासले असून त्याचे परिणाम अगदी गडदपणे दिसू लागले आहेत. बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर जलपर्णीचा विळखा दिसून येत असून नदीचे पात्र दिसेनासे झाले आहे. जलपर्णीचा विळखा नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नदीतील जलचर धोक्यात असून पाणी पातळी झपाट्याने कमी होते आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत घरोघरी उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी फिरताना दिसत आहेत. मात्र नदी प्रदूषणाकडे सर्वांचाच कानाडोळा झाल्याचे दिसते आहे.
उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कर्जत तालुक्यातून वाहत येत वांगणीजवळ ही नदी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. नदी किनारी अनेक ग्रामपंचायती या नदीतून पिण्यासाठी पाणी उचलतात. बदलापूर शहरात बॅरेज बंधाऱ्यावर अंबरनाथ आणि बदलापूर शहराची पाणी योजना आहे. येथून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते. पुढे याच नदीला जांभूळ येथे बारवी नदी येऊन मिळते. यात बारवी धरणातून पाणी साोडले जाते. ते पुढे जांभूळ बंधाऱ्यावरून उचलून त्यावर अंबरनाथजवळील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रियेसाठी पाठवले जाते. पुढे मोठमोठ्या जलवाहिन्यातून हेच पाणी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, ठाणे या शहरांना तर विविध औद्योगिक वसाहतींनाही पुरवले जाते. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने उल्हास नदीचे मोठे महत्व आहे. मात्र तरीही गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे. बदलापूर पश्चिमेतील चौपाटी परिसरापासून थेट जांभूळ बंधाऱ्यापर्यंतच्या भागात संपूर्ण नदीचा पात्र जलपर्णीमध्ये हरवले आहे. जलपर्णी इतकी दाट आहे की काही दिवसांपूर्वी एका तरुणीने येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या जलपर्णीत अडकल्याने सुदैवाने बचावली. सध्याच्या घडीला हे पात्र जलपर्णीमुळे इतके गर्द झाले आहे की एखाद्या उद्यानातील हिरवा गालीचा असल्यासमान नदी भासते. नदी पात्रावर आलेल्या जलपर्णीमुळे खाली तळापर्यंत सुर्यप्रकाश पोहोचण्यास अडथळा होत असून त्यामुळे पाण्यातील जलचर धोक्यात आले आहेत. नदीच्या या प्रदुषणावर तातडीने तोडगा काढून उल्हास नदी पुन्हा जलपर्णीमुक्त करावी अशी मागणी होते आहे.
हेही वाचा – उल्हासनगरात कलानी ताकदवान, श्रीकांत शिंदेंकडून टीम कलानीवर स्तुतीसुमने
प्रदुषण सुरूच
उल्हास नदी पात्रात नागरी आणि औद्योगिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप वर्षानुवर्षे होतो आहे. कर्जतपासून थेट कल्याणपर्यंत नागरीकरण झालेली, नागरिकरणाच्या वाटेवर असलेली शहरे, गावांतून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळते आहे. त्याकडे कायमच कानाडोळा झाला आहे. नदीत कचरा मिसळण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन फक्त फलकबाजी करण्यात धन्यता मानते आहे. त्यामुळे नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतेच आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत पालिका साहाय्यक आयुक्ताबरोबर सफाई कामगाराची अरेरावी
मोहीम थंडावली
तीन वर्षांपूर्वी उल्हास नदी जलपर्णीमुक्तीसाठी सगुणा रूरल फाऊंडेशनच्या मदतीने विशेष मोहीम राबवण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यात पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम थंडावली. चला जाणुया नदीला ही मोहीम राज्य सरकारने सुरू केली. मात्र तीचा प्रभाव पडू शकलेला नाही.