लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : शहर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे. रेल्वेस्थानका बाहेरील परिसरात सायंकाळच्यावेळी पदपथांवर फेरीवाल्यांचा बाजार भरत आहे. पदपथावर विक्री साहित्यासह ठाण मांडून बसलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे पदपथ अडविला जात आहे. हे फेरीवाले रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी विक्री करतात. या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नसून नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. तर, फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.
ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखोच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. या स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली सकाळच्या वेळेत फेरीवाले फारसे दिसून येत नाहीत. परंतू, सायंकाळ होताच या ठिकाणी फेरीवाले येण्यास सुरुवात होते. सायंकाळी घरी परतणारे अनेक नागरिक निवांत असतात, त्यामुळे ते काही तरी खरेदी करतील या उद्देशाने फेरीवाले वेगवेगळे साहित्य विक्रीसाठी घेऊन याठिकाणी बसलेले पाहायला मिळतात. खरंतर हा बाजार सायंकाळच्या वेळी कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरु लागला आहे.
आणखी वाचा-डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील लोखंडी सामानाचा वाहतुकीला अडथळा
स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली, गावदेवी परिसर, नौपाडा, नितीन कंपनी तसेच स्थानक परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरातही फेरीवाले पदपथ आणि रस्ते अडवीत असल्याचे दिसत आहे. या मार्गावरुन येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना या फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाचे या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांना आंदण दिले आहेत का असा सवाल काही नागरिकांकडून विचारला जात आहे. तर, फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई केली जात असून स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
नागरिक प्रतिक्रिया
मी दररोज गावदेवी परिसरातून लोकमान्य नगरला जाण्यासाठी रिक्षा पकडतो. अनेकदा सायंकाळच्यावेळी याठिकाणी जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध नसतात. त्यामुळे रिक्षा येईपर्यंत थांबावे लागते. या रिक्षा थांब्याला लागूनच पदपथ असूनही फेरीवाल्यांमुळे रस्तावरच उभे राहावे लागत आहे अशी प्रतिक्रिया राज चव्हाण यांनी दिली.
आणखी वाचा-तोतया पोलिसांकडून डोंबिवली पलावातील सेवानिवृत्ताची ७४ लाखाची फसवणूक
महापालिका प्रतिक्रिया…
स्थानक परिसर ते गावदेवी मंदिरापर्यंतचा सर्व परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. फेरीवाल्यांसदर्भात नुकतीच आमची बैठक झाली. स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी आम्ही पूर्णपणे बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी पथक नेमण्यात आले असून हे पथक दोन सत्रात काम करणार आहे. त्यामुळे सॅटीस पुलाखाली, पादचारी पुल, स्थानक परिसर, गावदेवी परिसर या ठिकाणी येत्या दिवसात एकही फेरीवाला दिसणार नाही. स्थानक परिसर ते गावदेवी मंदिर या १५० मीटर च्या क्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. तरी, या क्षेत्रात फेरीवाले दिसले तर, ताटकळ त्यांच्यावर कारवाई केली जाते. १५० मीटरच्या पुढील जे क्षेत्र आहे तसेच इतर परिसरातही अतिक्रमण विभागाची कर्मचारी नेमण्यात आली आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई नियमित सुरु आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.