कल्याण : कल्याण जवळील शहाड रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर पालिकेच्या अ प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने शुक्रवारी कारवाई केली. या कारवाईत पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करणारे, गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
मोहने भागात काही राजकीय मंडळी रस्ते, चौक अडवून कमानी बांधून त्यावर आपल्या राजकीय जाहिराती करत होते. काही जण त्या कमानी भाड्याने देत होते. या भागात स्थानिकांचा दबदबा असल्याने कोणीही पालिका अधिकारी या कमानीवर कारवाई करत नव्हते. अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे, फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी कामगारांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने त्या कमानी तोडून सर्व सामान जप्त केले.
हेही वाचा…डोंबिवलीतील नौदल अधिकाऱ्यासह नऊ जणांची कूटचलनातील गुंतवणुकीतून फसवणूक, २१ जणांची टोळी सक्रीय
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. शहाड रेल्वे स्थानक भागातील रस्ते, चौक फळ, भाजीपाला, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी ठेवले होते. शहाड रेल्वे स्थानकातून मुरबाड परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या प्रवाशांनाही फेरीवाल्यांचा त्रास होत होता. अनेक विक्रेत्यांनी पदपथावर कायमस्वरुपी लोखंडी, लाकडी निवारे उभारले होते. या फेरीवाल्यांविषयी वाढत्या तक्रारी साहाय्यक आयुक्त रोकडे, पथकप्रमुख साळुंखे यांच्याकडे आल्या होत्या.
शुक्रवारी दुपारी जेसीबी, दहा कामगारांचे पथक, तोडकाम पथक, पोलीस बंंदोबस्त घेऊन साहाय्यक आयुक्त रोकडे, पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे शहाड रेल्वे स्थानक भागात धडकले. त्यांनी तात्काळ फेरीवाल्यांना बचावाची कोणतीही संधी न देता त्यांचे निवारे तोडण्याची, सामान जप्त करण्याची कारवाई सुरू केली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने फेरीवाल्यांची पळापळ झाली.
अनेक विक्रेते पदपथ अडवून गॅस सिलिंडर वापरून खाद्य पदार्थ विकताना आढळले. त्यांचे व्यावसायिक सिलिंडर जप्त करण्यात आले. फळ, भाजीपाला विक्रीच्या हातगाड्या, आईसक्रिमच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. दोन डम्पर साहित्य शहाड रेल्वे भागातून जप्त करण्यात आले. शहाड रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना हटविल्याने रेल्वे स्थानक परिसर अनेक वर्षांनी मोकळा झाला आहे. नागरिकांनी या कारवाईविषयी समाधान व्यक्त केले. मोहने भागात काही राजकीय मंडळींनी फलक लावण्यासाठी कमानी उभारल्या होत्या. त्या दहशतीला न घाबरता साळुंखे यांनी कामगारांच्या साहाय्याने, जेसीबीने त्या कमानी तोडून टाकल्या.
हेही वाचा…रस्त्यावर तेल सांडल्याने पाच दुचाकी घसरून अपघात
टिटवाळा, मांडा, मोहने भागात फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू असते. आता शहाड रेल्वे स्थानक परिसरात दैनंदिन कारवाई केली जाणार आहे. रस्ते, चौक अडवून विनापरवानगी राजकीय व इतर फलक लावणाऱ्या कमानींवर कारवाई केली जाणार आहे. राजेंद्र साळुंखे फेरीवाला हटाव पथक प्रमुख, अ प्रभाग, टिटवाळा.