लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरून जात असताना एका फेरीवाल्याने नाशिक पंचवटी भागातून कल्याणला आलेल्या एका प्रवाशाला जोराने धक्का दिला. प्रवाशाने याप्रकरणी जाब विचारताच फेरीवाल्याने त्या प्रवाशाबरोबर भांडण उकरून काढून त्याला धक्काबुक्की करून त्याच्या ताब्यातील महागडा आयफोन हिसकावून पळ काढला होता.

अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवासी घाबरला होता. त्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून धक्काबुक्की करणाऱ्या चोरट्या फेरीवाल्याला अटक केली.

विक्रम शेलार असे नाशिक पंचवटी भागातून आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. राकेश यादव असे फेरीवाल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, विक्रम शेलार हे नाशिक येथून कल्याणमधील आपल्या मित्राला भेटण्यासाठी दोन दिवसापूर्वी कल्याणमध्ये आले होते. कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना स्कायवॉकवरून जात असताना त्यांना राकेश यादव या फेरीवाल्याने जोराचा धक्का दिला. काहीही कारण नसताना हेतुपुरस्सर धक्का दिल्याने शेलार यांनी यादव यांना जाब विचारला. यावेळी फेरीवाला राकेश यादव यांनी आक्रमक होऊन शेलार यांनाच उलटसुलट प्रश्न करून त्यांना मारहाण केली. या झटापटीत यादव यांनी विक्रम शेलार यांच्याजवळील महागडा आयफोन मोबाईल हिसकावून पळ काढला होता.

या घटनेची विक्रम शेलार यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू केला. रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरील ज्या भागात फेरीवाल्याने विक्रम शेलार यांना मारहाण केली. त्या भागातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी तपासले. त्यावेळी एक इसम शेलार यांना धक्काबुक्की करत असल्याचे आणि त्यांना मारहाण करून पळून जात असल्याचे पोलिसांना दिसले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांशी संपर्क करून शेलार यांच्याशी धक्काबुक्की करणाऱ्या, त्यांना मारहाण करणाऱ्या राकेश यादव यांचा ठावठिकाणा शोधून काढून त्यांना अटक केली. त्यांच्या जवळील चोरीचा महागडा आयफोन पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी विक्रम शेलार यांच्या तक्रारीवरून यादव विरुध्द गुन्हा दाखल केला.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर पालिकेकडून आक्रमक कारवाई होत नसल्याने या भागातील फेरीवाल्यांची दादागिरी वाढल्याच्या तक्रारी आहेत. सकाळ, संध्याकाळी फेरीवाले रेल्वे स्थानक भागातील स्कायवाॅकवर ठाण मांडून बसतात. रेल्वे हद्दीत सुरक्षा बळाचे जवान फेरीवाल्यांना बसून देत नाहीत. त्यामुळे फेरीवाले पालिका हद्दीतील स्कायवॉक भागात व्यवसाय करतात, अशा तक्रारी आहेत.