फेरीवाल्यांना रोखण्यासाठी सुरक्षा संस्थांची नेमणूक करण्याच्या हालचाली
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर वारंवार आदेश देऊनही प्रभावीपणे कारवाई होत नाही हे लक्षात येताच महापालिका प्रशासनाने आता हा परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी खासगी सुरक्षा एजन्सीची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘सॅटिस’वर ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांना हुसकावण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना देऊनही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने पालिकेच्या यंत्रणेवर अवलंबून राहण्यापेक्षा खासगी ठेकेदारांकडे हे काम सोपवण्याचा प्रस्ताव आखण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठरवल्याचे समजते.
ठाणे, कळवा परिसरातील सुमारे सहा लाख प्रवासी दररोज ठाणे स्थानकाच्या दिशेने ये-जा करत असतात. ठाणे शहर, घोडबंदर, वागळे इस्टेट, वर्तकनगर या संपूर्ण परिसरातून लोकलने प्रवास करण्यासाठी ठाणे हे एकमेव स्थानक आहे. त्यामुळे मूळ शहरात प्रवाशांच्या गर्दीचे लोट दररोज येत असतात. ही गर्दी कमी व्हावी यासाठी महापालिकेने रेल्वेच्या मदतीने काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प (सॅटिस) हाती घेतला. या परिसरात कोटय़वधी रुपयांचा खर्च करून उड्डाणपूल तसेच बस स्थानक उभारण्यात आले आहे. तसेच पादचाऱ्यांना स्थानकात सहज प्रवेश करता यावा यासाठी पादचारी पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. हा प्रकल्प प्रवाशांच्या सोयीसाठी उभारला गेला असला तरी सॅटिस पुलाच्या आश्रयाने गेल्या काही वर्षांत या भागात दुपटीने फेरीवाले वाढले आहेत. आर. ए. राजीव आयुक्त असताना त्यांनी रेल्वे स्थानक परिसर यशस्वीरीत्या फेरीवालामुक्त करून दाखविला. त्यांच्या बदलीनंतर मात्र या भागात फेरीवाल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असून महापालिकेतील प्रभाग कार्यालयाच्या मदतीशिवाय ही वाढ शक्य नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.
ठाणे महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारताच नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सॅटिसचा दौरा केला आणि या ठिकाणी बेकायदा फेरीवाले बसता कामा नयेत असे आदेश देऊ केले. काही दिवस या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली. जयस्वाल यांनी स्वत सॅटिसवरील अतिक्रमणांवर कारवाईची माहिती घेण्यासाठी यासंबंधीचा एक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर दररोज सायंकाळी सॅटिसचे छायाचित्र पाठविले जावे, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार फेरीवालामुक्त सॅटिसचे छायाचित्र दररोज नित्यनेमाने आयुक्तांना व्हॉटस्अ‍ॅपवर मिळते खरे, मात्र प्रत्यक्षात हा परिसर फेरीवाल्यांनी गजबजलेला असतो असे दिसून आले आहे. ‘लोकसत्ता ठाणे’ने यासंबंधीचे छायाचित्र नुकतेच प्रसिद्ध केले होते.
दरम्यान, प्रभाग स्तरावरील कारवाईचा हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने सॅटिस अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी खासगी यंत्रणा उभी करण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी खासगी ठेकेदार नेमून त्यांच्यामार्फत फेरीवाल्यांवर कारवाई करावी असा हा प्रस्ताव आहे. या ठेकेदारामार्फत सॅटिसच्या वेगवेगळ्या मार्गिका, पूल, खालचा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यावर देखरेख ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

सॅटिस परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेमार्फत नियमित कारवाई होत असली तरी ती पुरेशी नाही असे जाणवू लागले आहे. प्रवाशांना अडथळामुक्त प्रवासी सेवा उपलब्ध करून देणे आमचे कर्तव्य असून त्यासाठी परंपरागत वाटा मोडीत काढून काही वेगळे प्रयोग केले तर त्यास कुणाची हरकत नसावी. त्यामुळेच या ठिकाणी खासगी यंत्रणेमार्फत देखरेख ठेवण्याचा विचार आहे.
– संजीव जयस्वाल, पालिका आयुक्त

Story img Loader