चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ‘बाजार शुल्क विभागाच्या वसुली’चे वार्षिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात या विभागाकडूनच मोठय़ा प्रमाणात फेरीवाले बसविले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. रेल्वे स्थानक परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करण्यात आला असतानाही बाजार शुल्क विभागाचे कर्मचारी या भागात फेरीवाल्यांसाठी मोकळे रान उपलब्ध करून देत असल्याचे समजते. या फेरीवाल्यांकडून महापालिका कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर शुल्क वसूल करत असून एकीकडे महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होत असले तरी कल्याण-डोंबिवलीकर मात्र फेरीवाल्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रासून गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ना फेरीवाला विभागा’तून वसुली
डोंबिवली, कल्याणमध्ये बाजार शुल्क विभागाकडून फेरीवाल्यांकडून ठराविक दराने शुल्क वसुली केली जाते. यापूर्वी ही वसुली ठेकेदाराकडून केली जात होती. महापालिका ठेकेदारांकडून वाढीव ठेक्याची अपेक्षा ठेवून ना फेरीवाला विभागात ठेकेदाराला वसुली करण्यास नकार देत होती. त्यामुळे ठेकेदारांनी पालिकेकडे पाठ फिरवली. एका आर्थिक वर्षांत सुमारे दोन ते अडीच कोटीपर्यंतची बाजार शुल्क वसुली केली जाते. रेल्वे स्थानकापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर बसणाऱ्या फेरीवाले, विक्रेत्यांकडून ही वसुली करणे आवश्यक असते. रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांचा व्यसाय होतो. त्यामुळे बाजार शुल्क कर्मचारी फेरीवाला विभागासह रेल्वे स्थानक भागात बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून नियमित वसुली करतात.

हातचलाखीमुळे महापालिकेचे नुकसान
रेल्वे स्थानक परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून फेरीवाल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. या फेरीवाल्यांकडून महापालिका कर्मचारी बाजार शुल्क वसुलीबरोबर खासगी वसुली करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. आमचे वसुली लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा, असे आर्जव कर्मचाऱ्यांकडून फेरीवाल्यांना केले जात आहे. एका फेरीवाल्याकडून महिन्यातील १५ दिवस शुल्क वसुली करून त्याला पावत्या द्यायच्या आणि उर्वरित पंधरा दिवसाचे शुल्क वसूल करून ते खिशात घालायचे, असे प्रकारही सुरू झाले आहेत.  

फेरीवाल्यांनी गजबजले रस्ते
डोंबिवलीत पाटकर रस्ता, रॉथ रस्ता, उर्सेकरवाडी, चिमणी गल्ली, बाजी प्रभू चौक, फडके रस्ता, राजाजी रस्ता, वाहतूक कार्यालय, कल्याण पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, महालक्ष्मी हॉटेल रस्ता, वलीपीर रस्ता, दीपक हॉटेल परिसर, महमद अली चौक, स्कायवॉक, शिवाजी चौक

* गेल्या महिनाभरात डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कधी नव्हे इतक्या मोठय़ा संख्येने फेरीवाले अवतरले आहेत.
* रस्ते, पदपथ, आडोशाच्या जागा पटकावून या फेरीवाल्यांचे उद्योग सुरू आहेत.
* राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सुमारे नऊ हजार फेरीवाल्यांची  नोंदणी महापालिकेने केली आहे. या नोंदणीत अधिकाऱ्यांनी मोठा गोंधळ घालून ठेवला आहे.
* नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांना आपण रस्ते, पदपथावर बसण्यास मोकळे झालो आहोत, असे वाटू लागले आहे.

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्यापासून बाजार शुल्क वसुली सुरू आहे. आतापर्यंत एक कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. १ कोटी ९० लाखांचे लक्ष्य आहे. निम्माहून अधिक महसूल जमा केला आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून  शुल्कवसुली करण्यात येते. बाजार शुल्क वसुली, फेरीवाल्यांवरील कारवाई प्रभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. शुल्क वसुली करताना कोणातीही हेराफेरी
होत नाही.  
    – राजेंद्र ठोके,  बाजार शुल्क निरीक्षक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hawkers encroach in kalyan
Show comments