ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्याच्या नवीन महापालिका आयुक्तसंजीव जयस्वाल यांच्या आदेशानंतर ‘सॅटिस’वरील फेरीवाले गायब झाले होते. आयुक्तांच्या या निर्णयामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत असले तरी ही कारवाई अल्पजीवी ठरण्याची चिन्हे आहेत. फेरीवाल्यांना त्यांचे बस्तान मांडता यावे, यासाठी ठाण्यातील राजकीय नेते पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून पालिकेतील उच्चपदस्थांना ही कारवाई रोखण्याची ‘सूचना’ मंत्रालयातूनच आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविल्याने सर्वसामान्यांना मोकळा श्वास घेणे गेले आठवडाभर शक्य झाले होते. या परिसरात ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांना नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दणका दिला होता. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर आयुक्त जयस्वाल यांनी अचानक रेल्वे स्थानक परिसराला भेट देऊन हा सारा विभाग फेरीवालामुक्त करण्याचा आदेश दिला होता. आयुक्तांच्या आदेशाने पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या परिसरातील सारे फेरीवाले एका दिवसात हटविले. फेरीवाल्यांना हटविल्याने दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. फेरीवाल्यांनी अडविलेला रस्ता मोकळा झाल्याने विशेषत: सायंकाळी या परिसरातून ये-जा करणे सोपे झाले होते.
फेरीवाल्यांना हटविल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी ठाण्यातील राजकीय नेतेमंडळींना मात्र सामान्यांच्या हितापेक्षा फेरीवाल्यांचा जास्त कळवळा दिसतो. कारण या कारवाईनंतर लगेचच पालिकेच्या उच्चपदस्थांना ‘फेरीवाल्यांना त्रास का देता’ अशी विचारणा थेट मंत्रालयातून झाल्याचे समजते. वरिष्ठांनीच फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने पालिका प्रशासनाने कारवाईबाबत थोडे आस्ते कदम भूमिका घेतली. परिणामी गेल्या तीन-चार दिवसांपासून स्थानक परिसरात पुन्हा फेरीवाले दिसू लागले आहेत.