पालिकेच्या ‘धडाक्या’ची इंदिरानगरला झळ नाही

ठाणे रेल्वे स्थानकात सकाळ, संध्याकाळी फेरी मारत अवघ्या शहरातील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करत असल्याचा आव आणणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून मंगळवारी इंदिरानगर भागातील आठवडा बाजार भरला. ‘कारवाई तर स्थानक परिसरात सुरू आहे. आम्हाला कशाचा डर?’ अशी प्रतिक्रिया या भागातील फेरीवाले देत होते. विशेष म्हणजे, मंगळवारी सायंकाळी घोडबंदर तसेच लोकपुरम भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात पालिकेचे अधिकारी गुंतले असताना इंदिरानगर परिसरात आठवडा बाजारामुळे नेहमी होणारी गर्दी व कोंडी यांचे चित्र कायम होते.

इंदिरानगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो. हा परिसर झोपडपट्टीबहुल असल्यामुळे स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात दर मंगळवारी प्रचंड गर्दी होते. परंतु हा संपूर्ण बाजार परिसरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरवण्यात येत असल्याने या बाजाराचा वाहतुकीला मोठा फटका बसतो.  इंदिरानगरच्या नाक्यावर मंगळवारी एक हजाराच्या आसपास लहान-मोठे विक्रेते ठाण मांडून बसतात. या सर्वाकडून स्थानिक गावगुंड १०० पासून २५० रुपयांपर्यंत हप्ता वसूल करतात. यासाठी कोणतीही पावती दिली जात नसल्याने साहजिकच ही वसुली बेकायदा असल्याचे स्पष्ट होते.

गेल्या आठवडय़ात महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानक परिसरात फेरीवाले, बेशिस्त रिक्षाचालक, बेकायदा वाहनतळ यांच्यावर जोरदार कारवाई सुरू केली आहे. परंतु एकीकडे अशी कारवाई सुरू असताना शहरातील अन्य भागांत मात्र फेरीवाले निर्धास्तपणे आपले व्यवहार करत आहेत. जयस्वाल यांच्या फेरीवाला हटाव मोहिमेमुळे मंगळवारी इंदिरानगर भागात भरणाऱ्या ‘मंगल’ बाजाराचे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष होते. या बाजारावर जयस्वाल यांचा हातोडा फिरेल असेही बोलले जात होते. प्रत्यक्षात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अगदी नेहमीप्रमाणे हा बाजार भरला आणि रात्री उशिरापर्यंत कोणत्याही अडथळ्याविना तो सुरू होता.

वाहतुकीसाठी अमंगळवार

सावरकरनगर नाका, साठेनगर, ज्ञानेश्वरनगर परिसरात सायंकाळी नागरिकांना या बाजारामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. रस्त्यातच बसलेल्या या विक्रेत्यांकडून वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी अर्धा रस्ता व्यापला होता. विशेष म्हणजे या रस्त्यातच असणारा ठाणे परिवहन सेवेचा बस थांबा रस्त्यावरील विक्रेत्यांनी व्यापला होता. सायंकाळच्या वेळी स्थानक परिसरातून येणाऱ्या शेअर रिक्षा याच मार्गातून मार्गक्रमण करत असल्याने मंगळवारी येथून प्रवास नकोसा वाटतो, अशी प्रतिक्रिया येथील काही नागरिकांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

जयस्वाल यहां नहीं आयेंगे

‘अधिकारी कारवाईसाठी येतात तेव्हा पैसे मागत नाहीत. बाजार मांडायच्या सुरुवातीला इतर वेळी प्रत्येक विक्रेत्याकडून नोट घेऊन जातात. आजही येऊन गेले. जास्त मोबदल्यासाठी पुढल्या मंगळवारी पुन्हा बाजार मांडू..’ गेली अनेक वर्षे इंदिरानगर परिसरात असलेल्या आठवडा बाजारातील एका विक्रेत्याची ही प्रतिक्रिया कारवाईसाठी येणाऱ्या पथकाच्या भोंगळ कारभाराविषयी साक्ष देणारी आहे. ‘साहेब जयस्वाल यहा नहीं आयेंगे. छोटे साहब का मेसेज आया है.. साहब आज मंत्रालय में हैं’, एका भांडी विक्रेत्याने दिलेली ही प्रतिक्रिया फेरीवाल्यांचे ‘नेटवर्क’ किती आतपर्यंत पोहोचले आहे, हे दाखवण्यास पुरेशी ठरते.

Story img Loader