अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना फेरीवाल्यांचा प्रचंड विळखा पडला असून त्यापासून रेल्वे स्थानक, स्कायवॉक आणि रेल्वेचे पादचारी पूलही सुटलेले नाहीत. अंबरनाथच्या रेल्वेच्या पादचारी पुलावर अशाच प्रकारे बेकायदा फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले असून, पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
अंबरनाथ शहराला पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर सध्या मोठय़ा प्रमाणावर भाजी आणि फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. त्यात स्थानिक भाजी विक्रेत्यांसह आदिवासी महिलांनीही आपली दुकाने थाटली आहेत. पुलाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक पायरीवर हे फेरीवाले बसलेले दिसतात. त्यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रेल्वे स्थानकावर लोकलचे आगमन होताच, या पुलावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असते. अनेकदा वृद्ध आणि महिलांना मार्गक्रमण करताना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. सायंकाळच्या वेळी यावर मोठी कोंडी होत असते.
लोकलचे प्रवासी बाहेर पडताच कर्णकर्कश आवाजात भाजी विक्रेते आणि फेरीवाले ओरडत असतात. त्यामुळे एकूणच येथे गोंधळाचे वातावरण असते. त्यामुळे या फेरीवाल्यांना आवरा आणि पादचारी पूल मोकळा करून द्या, अशी मागणी आता सुज्ञ नागरिक करत आहेत.
या फेरीवाल्यांवर अनेकदा कारवाई केली जाते. मात्र कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी या पुलावर पुन्हा फेरीवाले बस्तान मांडताना दिसतात. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईचा या फेरीवाल्यांना काहीच धाक दिसत नसल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा