डोंबिवली : ड़ोंबिवली पूर्वेतील रामनगर मधील सर्वाधिक वर्दळीच्या आनंद बालभवन वास्तुच्या पदपथावर फेरीवाल्यांनी टपरी आणि हातगाड्या लावून वस्तू विक्री व्यवसाय सुरू केले आहेत. स्थानिक रहिवाशांनी या विक्रेत्यांना या ठिकाणाहून हटविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते दाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत.
आम्ही रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या बाहेर आहोत. तुम्ही आम्हाला हटविणारे कोण, असे प्रश्न हे फेरीवाले, टपरीवाले स्थानिक रहिवाशांना करत आहेत.आनंद बालभवन मध्ये अनेक उपक्रम दररोज सुरू असतात. शाळकरी मुले येथे कराटे, योगा, शरीर सुदृढतेचे अनेक प्रकार करण्यासाठी येतात. याठिकाणी पालकांची गर्दी असते. अनेक पालक आपल्या पाल्यांना घेण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन बालभवन येथे येतात. त्यांना या फेरीवाल्यांमुळे वाहने उभी करण्यास अडथळा येत आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली : शिळफाटा चौकात वाहतूक सेवकांच्या उपद्रवाने प्रवासी हैराण
आनंद बालभवनच्या बाहेरील पदपथावरील बाकड्यांवर रामनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक सकाळ, संध्याकाळ विरंगुळा म्हणून येऊन बसतात. आता हे फेरीवाले या पदपथावर येऊन व्यवसाय करू लागल्याने ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बालभवनच्या बाहेर पदपथ अडवून रात्रीच्या वेळेत टपरी आणून ठेवण्यात आली आहे. ही टपरी कोणाच्या मालकीची आहे हे अद्याप स्थानिकांना समजले नाही.
बालभवन शेजारील हातगाडीवरुन शहाळांची विक्री केली जाते. रिकामी शहाळी फेरीवाला हातगाडीच्या आडोशाला लावून ठेवतो. या रिकाम्या शहाळ्यांच्या मध्ये पावसाचे पाणी साचून त्यात साथरोग फैलावणारे डास निर्माण झाले तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न या भागातील रहिवासी करत आहेत. या पदपथाच्या बाजुला महावितरणचे वीज पुरवठा करणारे छोटे खांब आहेत. उच्च दाबाच्या जीवंत वीज वाहिन्या या भागातून गेल्या आहेत. या छोट्या खांबांमध्ये शाॅर्ट सर्किट होऊन काही दुर्घटना घडली तर फेरीवाले, ग्राहक, बाजुच्या बालभवनला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली, कल्याणमध्ये वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहन मालक हैराण
या फेरीवाल्यांमुळे इतरही फेरीवाले या भागातील रस्त्यांवर येऊन बसण्याची शक्यता आहे. डोंबिवली, कल्याण मधील अनेक पदपथांवर विक्रेत्यांनी पालिकेचे आपल्याकडे लक्ष नाही, असा विचार करुन पदपथ अडवून तेथे टपऱ्या ठेवण्यास सुरुवात केली आहे. काही राजकीय व्यक्ती या टपरी चालकांच्या मागे असल्याची चर्चा आहे. बालभवन भागात व्यवसाय करणारे दाद देत नसल्याने रामनगर मधील स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात पालिकेच्या ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
“ ग प्रभाग हद्दीतील पदपथ, रस्ते फेरीवाला मुक्त केले आहेत. त्यांचे आठवडी बाजार बंद केले आहेत. आनंद बालभवन जवळ कोणी फेरीवाला हातगाडी माध्यमातून व्यवसाय करत असेल, पदपथ अडवून टपरी लावून व्यवसाय करत असेल तर हातगाडी, टपरी जप्त केली जाईल. तात्काळ ही कारवाई करण्यात येईल.” –राजेंद्र साळुंखे, पथक प्रमुख, ग प्रभाग, डोंबिवली.