लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : येथील पूर्वेतील ग प्रभागातील रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर एकही फेरीवाल्याला बसू दिले जात नसल्याने संतप्त फेरीवाल्यांनी बुधवारी ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथक प्रमुखासह कामगारांना घेराव घातला. आम्हाला पर्यायी जागा द्या, मगच आमच्यावर कारवाई करा, अशी आक्रमक मागणी फेरीवाल्यांनी केली.
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीतील रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये असे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशामुळे डोंबिवली पूर्वेत ग प्रभागातील रॉथ रस्ता, रामनगर, राजाजी रस्ता, उर्सेकरवाडी भागात फेरीवाल्यांवर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे आणि इतर सहकारी कारवाई करत आहेत.
आणखी वाचा-कडोंमपाचा अजब कारभार, इलेक्ट्रिक बस दाखल पण चार्जिंग स्टेशनचा अजून पत्ताच नाही
मागील दोन ते तीन महिन्यात फेरीवाल्यांच्या १०० हून अधिक हातगाड्या ग प्रभाग पथकाने जप्त केल्या आहेत. तर काही तोडून टाकल्या आहेत. या सततच्या कारवाईने व्यवसाय करता येत नसल्याने बुधवारी फेरीवाल्यांनी ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख राजेंद्र साळुंखे यांच्यासह सहकाऱ्यांना घेराव घातला आणि कारवाई करण्यापासून रोखले. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या बाहेर तुम्ही व्यवसाय करा, रेल्वे स्थानक परिसरात एकाही फेरीवाल्याला बसू दिले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका साळुंखे यांनी घेतली. त्यामुळे फेरीवाल्यांनी काढता पाय घेतला. रेटून रेल्वे स्थानक भागात व्यवसाय केला तर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा साळुंखे यांनी फेरीवाल्यांना दिला आहे.