कल्याण : शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे आदिवासी भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. या शिबिरात ६० हून अधिक आदिवासी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, असे कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अजय क्षीरसागर यांनी सांगितले.
आदिवासी, दुर्गम भागातील अनेक रहिवाशांना आपल्याला मोतिबिंदू किंवा डोळ्यांचा काही आजार आहे. मधुमेह, रक्तदाबासारखे आजार आहे याची जाणीव नसते. आजार वाढल्यावर मग हे रहिवासी डाॅक्टरकडे फेऱ्या मारतात. अशा रहिवाशांना प्राथमिक अवस्थेत आपल्याला असलेल्या व्याधीची माहिती असावी. या उद्देशातून राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेतर्फे शहापूर जवळील माहुली किल्ल्याच्या पायथ्या जवळील आवळे बोरीचापाडा या आदिवासी गावात दिवसभरासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक, डाॅक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
यावेळी केलेल्या वैद्यकीय तपासणीत ६० आदिवासी बांधवांची दृष्टी अधू होती. त्यांना मोफत ६० चष्मे देण्यात आले. सहा रहिवाशांना मोतिबिंदू आढळून आला. चार जणांना रक्तदाबाचा त्रास होता. तर सहा जणांना मधुमेह आजार आढळून आला. या सर्व रुग्णांवर तात्काळ प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात येण्याची सूचना करण्यात आली. त्यांच्या आवश्यक तपासण्या करुन त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळतील यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.