समुद्र कुटुंबीयांचे म्हणणे लेखी स्वरूपात न्यायालयात; गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित
बदलापूर : बदलापूरसह राज्यातील अनेक शहरांतील हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडून न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यावर येत्या ५ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र कुटुंबीयांच्या मालमत्तांचा लिलाव लवकरच होण्याची आशा गुंतवणूकदारांमध्ये आहे.
दरम्यान या सुनावणीपूर्वी समुद्र कुटुंबीयांकडून न्यायालयात त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी बदलापुरातील ‘सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी’च्या संचालकांनी गुंतवणूकदारांना व्याजाचे पैसे परत देण्याचे बंद केले होते. त्यानंतर काही दिवसातच कंपनीच्या संचालकांनी पोबारा केल्याने कंपनी बंद झाल्याचे जाहीर झाले. त्यामुळे बदलापूरसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपये बुडाले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर सागर इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुहास समुद्र आणि सुनीता समुद्र यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे शरणागती पत्करली.
वर्षभरानंतर मुख्य सूत्रधार असलेल्या श्रीराम समुद्र याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. सर्व आरोपी न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आली. त्यात ठाणे जिल्ह्य़ातील फ्लॅट, गाळे, जमिनी, बंगले अशा विविध मालमत्ता जप्त करत त्याचे पत्र शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते.
त्यासोबत विविध बॅंकांमध्ये असलेले ३८ बँक खातेही गोठवण्यात आले होते. त्यामुळे सागर इन्व्हेस्टमेंटच्या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र गेल्या वर्षांत या मालमत्तांचा लिलाव होऊ शकला नव्हता, असे सूत्रांनी या वेळी सांगितले.
प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वीच सादर
या प्रकरणाचा अहवाल उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी पाच महिन्यांपूर्वी न्यायालयाला सादर केल्याची माहिती सागर गुंतवणूकदारांचे वकील टी. पी. राठोड यांनी दिली आहे. मात्र याप्रकरणी सुनावणी होऊ न शकल्याने मालमत्तांचा लिलाव थांबला आहे. येत्या ५ मार्च रोजी मालमत्तांच्या लिलावाचे प्रकरण न्यायालयासमोर सुनावणीसाठी येणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले आहे. त्यामुळे ५ मार्च रोजी समुद्र कुटुंबीयांच्या मालमत्तांच्या लिलावावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.