|| वैद्य विक्रांत जाधव
बदलती जीवनशैली, चुकीची आहारपद्धती यांमुळे हृदयरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हृदयरोगी रुग्णांनी त्यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. हृदयरोगामध्ये काय खावे, काय खाऊ नये याची माहिती आयुर्वेदात दिली आहे. ‘आयुर्वेद दिना’निमित्त हृदयरोग आणि आयुर्वेद याची माहिती देणारा लेख..
हृदयरोगामध्ये मका व मक्याचे सर्व प्रकार टाळणे गरजेचे आहे. कारण यामुळे हृदयरोगाचा त्रास वाढताना दिसून येतो. बाजरी, नाचणी, तांदूळ आदी कोरडी धान्ये तसेच ज्वारीही हृदयरोगामध्ये टाळण्याचा सल्ला शास्त्रकारांनी दिला आहे. हृदयरोगी कुरमुऱ्यासारखे पदार्थही खूप प्रमाणात खाताना आढळतात. त्यांनीही ते टाळणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या डाळींनासुद्धा शास्त्राने विरोध केला असून वाटाणे, राजमा, उडीद दाळ, मटकी, मटार, चवळी, छोले हे पदार्थ पूर्णत: टाळावेत. या पदार्थाचे सेवन हृदयरोगाची लक्षणे तात्काळ वाढवताना दिसून येते.
मिसळसारखा महाराष्ट्रात प्रचलित असलेला पदार्थ हृदयरोगी व्यक्तींनी टाळणे आवश्यक ठरते. यामधील पोहे, साबुदाणा, बटाटे हे पदार्थही हृदयरोगी व्यक्तींना अपथ्यकारक आहेत. उपवास करणाऱ्या हृदयरोगी व्यक्तींना अपथ्यकारक आहेत. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी साबुदाणा, भगर, रताळीसुद्धा टाळावीत. या पदार्थाच्या सेवनाने तात्काळ हृदयाच्या लक्षणांमध्ये वाढ झालेली दिसून येते. आंबट, तुरट तसेच अतिगोड फळांच्या सेवनानेही हृदयरोगाची अवस्था बळावते. जांभूळ, कलिंगड, फणस, सीताफळे, स्ट्रॉबेरी, तुती, ब्लॅक बेरी, अननस, बोरे, कच्ची केळी तसेच सफरचंद हे शास्त्रसल्ल्याने टाळावे. विविध प्रकारच्या पालेभाज्या हृदयरोगांनी टाळाव्यात किंवा खाऊ नयेत. शेवग्याच्या पानांना व फुलांनाही आयुर्वेदाने विरोध केला आहे. डांगर व कारली यांचे सेवनही हृदयरोगी व्यक्तींना त्रासदायक ठरते. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खाण्यास मज्जाव आहे. तर मेंढी, डुकराचे मांस खाणाऱ्या हृदयरोगींनी ते खाण्याचा मोह टाळावा.
8आयुर्वेदीय ग्रंथकारांनी पोटाच्या वाताच्या विविध त्रासानंतर ‘हृदयरोग’ व्याधीचा क्रम लावलेला दिसून येतो. असंख्य वेळेस हृदयाची आशुकारी अवस्था पोटाच्या विकारांची लक्षणे निर्माण होऊन आलेली दिसते. पोटफुगी, ढेकर, छातीत जळजळ, छातीत आग होणे, मलप्रवृत्ती न होणे, त्याबरोबरच हृदयाच्या ठिकाणी जड होणे, पाठ दुखणे, अस्वस्थता, कधी उलटी या लक्षणांसह हृदयाच्या विकृतीची अवस्था निर्माण होते. यावरून उदारास्थ व्याधींचा संबंध स्पष्ट होतो. दुसऱ्या बाजूने विचार केल्यास पोटाच्या विकारांवर मात न केल्यास योग्य प्रकारे पथ्य न पाळल्यास हृदयरोग निर्माण होऊ शकतो, असेही म्हणता येईल. तसेच हृदयरोग ही एक प्राणघातक ठरणारी व्याधी असून लक्षणे अंगावर काढत राहिल्याने अतिप्रकारचा आत्मविश्वास स्वत:वर ठेवल्याने जिवावर बेतते, याची असंख्य उदाहरणे आहेत. म्हणून योग्य प्रकारे दक्षता, उपचार, पथ्य पाळणे शरीर संरक्षण करावे. हृदयरोगाचे असंख्य प्रकार आयुर्वेदीय ग्रंथांनी वर्णन केले असून स्थूल प्रकारे सर्व हृदयरोगांसाठी पथ्य-अपथ्य वर्णन केले आहे. गार पाणी, अतिथंड पाणी, साठवून ठेवलेले पाणी, अशुद्ध पाणी हृदयरोग असताना टाळावे. मोठय़ा शहरांमध्ये काही घरांमध्ये फ्रिजमधील थंड पाणी तात्काळ पिण्याची सवय असते हे सर्व प्रथम टाळणे महत्त्वाचे ठरते. थंड व गरम एकाच वेळी खाणे हृदयरोग्यांना त्रास देणारे असून विरुद्धाहार टाळणे गरजेचे दिसून येते.
हृदयरोगाचे अपथ्य पाहताना खूप व्यक्तींच्या मनात द्विधा निर्माण झाली असेल. हृदयरोग्याच्या अपथ्यांमध्ये आयुर्वेद शास्त्रकारांनी केवळ साठणारी चरबी, वाढणारी चरबी, रक्त वाहिन्यांची विकृत अवस्था असा एकात्मिक विचार केला नसून, ‘संपूर्ण हृदय’ या करणाऱ्या पदार्थाचा विचार केलेला दिसून येतो. या अपथ्य आहाराच्या पालनामुळे अनेक रुग्णांना सकारात्मक लाभ झालेला दिसून येतो. हृद्रोगी रुग्णांनी केवळ दूध सेवन करू नये. धारोष्ण दूध सेवनाला निषिद्ध मानले असले तरी सध्या धारोष्ण दूध घेणाऱ्यांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी असेल. थंड दूध या रुग्णांनी पूर्णत: टाळावे. (हृदयरोगामध्ये छातीत आग होत असताना थंड दूध घेण्याची प्रथा आहे, ती चुकीची आहे). दुधापासून निर्माण होणारे खव्याचे प्रकार, अगदी प्रसादसुद्धा हृदयरोगींनी टाळणे आवश्यक ठरते. सध्याच्या काळात प्रचलित झालेला ‘पनीर’ हा प्रकार हृदयरोगींना अत्यंत त्रासदायक असून चीज बटरही टाळावे. हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी दहीसुद्धा सेवन करण्यास शास्त्राचा विरोध आहे. अतिगरम, अतिथंड जेवण टाळावे, तर थंड-गरम एकाच वेळी सेवनही टाळावे. शिळे अन्न तर खाऊ नये आणि मोह आवरून ‘चाट’चे सर्व प्रकार हृदयरोग असताना सेवन करू नयेत. यामध्ये भजी, डाळ, वडे आदी प्रकारही समाविष्ट झाले. वाळलेले मांस, वाळवलेल्या भाज्या, फ्रिजमधील भाज्या, वाळवलेली चवळी, वाटाणे, वाल ही कडधान्ये सेवन करू नयेत. अत्यंत चमचमीत पदार्थ या रुग्णांनी टाळलेले उत्तम. कधी कधी कंटाळा आला म्हणून हे ‘चाट’ घरी करून या व्यक्ती सेवन करतात. पण विसरू नका त्याचे गुणधर्म हृदयाला घातकच ठरतात!
हृदयरोगात तूप
आयुर्वेद शास्त्रकारांनी ‘तूप’ हृदयरोगाच्या प्रकारांमध्ये खाण्याचा सल्ला दिला आहे. (हे वाक्य अनेकांना धक्का देणारे ठरू शकते! ) किंबहुना हृदयरोगाच्या चिकित्सेमध्ये विविध प्रकारची औषधी गुणयुक्त ‘सिद्ध धृत’ हृदयरोग बरा करण्यासाठी वापरलेली दिसून येतात. पथ्य-अपथ्याच्या या प्रवासात आयुर्वेद शास्त्रकारांनी ज्या ज्या ठिकाणी जे जे खायला सांगितले आहे ते ते ‘अपथ्य’ (म्हणजे व खाण्याच्या गोष्टी पाळल्यास) तंतोतंत पाळल्यास काय खावे हे स्पष्ट होते. म्हणजेच हृदयरोगामध्ये न खाण्याच्या गोष्टी वा पदार्थ खाऊन त्याबरोबर केवळ तूप खायला सांगितले म्हणून हे खाणे चुकीचे आहे. तूप खायला सांगताना तुपाचा हृदयावर अहितकारक गुणात्मक परिणाम नाही व तूप स्नेहद्रव्यांमधील श्रेष्ठ व शरीरस्वास्थ्याला हितकारक असल्याने आग्रह केला आहे. ताजे तूप हे स्मृती वाढवणारे, ग्रहणशक्ती, ज्ञानशक्ती, आयुष्य व शुक्र वाढवणारे आहे. डोळ्यांसाठी अत्यंत हितकारक असून बाल, वृद्ध आदींची कांती सुकुमारता वाढवणारे स्वर्माधुर्यादायक ठरते. क्षीण झालेल्या व्यक्तींसाठी, नागीण, कांजिण्या या व्याधींवर तसेच चक्कर यावर अत्यंत हितकारक आहे. वात-पित्त यांची विकृती दूर करणारे, जीर्ण
ज्वरावर तसेच दारिद्रय़नाशक असल्याचे शास्त्रीय वाचन आहे. योग्य प्रकारे धृताची योजना केल्यास अत्यंत उपयुक्त कार्य करणारे ठरते, असेही शास्त्र म्हणते. म्हणजे ‘तूप’ इतर स्नेहद्रव्यांना टाळून वरील गुणांसाठी सेवन करण्याचा सल्ला शास्त्राचा दिसून येतो. दुसरे त्याची मात्रा हे व्यक्तीप्रकृती, अवस्थेप्रमाणे ठरवण्याचाही सल्ला शास्त्राने दिला आहे, एवढे मात्र नक्की!
(संधिवातावर आयुर्वेदिक उपचार : वैद्य विजय कुलकर्णी)
संधिवाताचा उपचार करताना वातदोषांचा विचार सर्वप्रथम करावा लागतो. तेल हे वातदोषावर श्रेष्ठ औषध आहे. संधिवातावरील सांधेदुखीवर बाहेरून तेल लावणे हा एक प्रमुख उपचार होय. यासाठी तिळाचे तेल अतिशय उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे तीळ तेलाचा बेस म्हणून उपयोग करून नारायण तेल, महानारायण तेल, वातनाशक तेल, अभ्यंग तेल, अश्वगंधादी तेल, निर्गुडी तेल अशा विविध तेलाचा उपयोग वेगवेगळ्या अवस्थांनुसार वैद्यकीय सल्लय़ाने करता येतो.
सांधेदुखीवर दुसरा महत्त्वाचा उपचार म्हणजे ‘शेक घेणे’ हा होय. यालाच स्वेदन असे म्हणतात. या स्वेदनामुळे म्हणजे शेकामुळे सांधेदुखीवर बराच आराम पडतो. हा शेक घेण्यासाठी गरम पाण्याची पिशवी, गरम कपडा, गरम पाणी, गरम वाळूची पुरचुंडी, विटेचा गरम केलेला तुकडा अशी विविध साधने वापरता येतात.
संधिवातात आणि आमवातात वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये फरक असतो. संधिवातात घ्यावयाचा शेक हा स्निग्ध शेक असतो. म्हणजे यामध्ये सांध्याच्या ठिकाणी तेल लावून त्यावर गरम पाणी ओतणे, गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम कपडयाने शेकणे हे अभिप्रेत असते.
‘बस्ती’ हा उपक्रम या सांधेदुखीवर फायदेशीर ठरतो. या उपक्रमामध्ये गुद्द्वारावाटे काही औषधी तेल किंवा काढा आतल्या आतडय़ापर्यंत पोहोचवले जातात. वातदोषांच्या नियंत्रणासाठी याचा अप्रतिम उपयोग होतो. शरीराच्या कोणत्याही भागात मधूनमधून होणाऱ्या वेदना या बस्तीचिकित्सेमुळे कमी होतात. बस्तीप्रमाणेच ‘सौम्य विरेचन’ हे देखील बऱ्याचदा वातदोषामुळे होणाऱ्या व्याधींवर उपयुक्त ठरते.