गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर नोंदलं गेलं आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी तापमानात किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र जिल्ह्यात उकाडा तितक्याच प्रमाणात जाणवत होता. जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद डोंबिवलीजवळच्या पलावा येथे झाली. दुपारच्या वेळी येथील तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यापाठोपाठ भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि ठाणे शहरातील नागरिकांना रखरखत्या उन्हाचा प्रचंड त्रास झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात उष्णतेने उच्चांक गाठला आहे. बुधवारी या वर्षातलं सर्वाधिक उच्चांकी तापमान ठाणे जिल्ह्यात नोंदलं आहे. खाजगी हवामान अभ्यासकांच्या कोकण हवामान गटाने या उच्चतम तापमानाची नोंद केली. गुरुवारीही अशाच प्रकारचे तापमान असेल असे भाकित वर्तवण्यात आले होतं. गुरुवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. दुपारी दोन वाजेपर्यंत येथील तापमानाने ४२ अंश सेल्सिअस पल्ला पार केला होता.
गुरुवारी पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद डोंबिवली शेजारील पलावा भागात झाली. येथील तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. तर ठाणे जिल्ह्याच्या शेजारील कर्जत शहरात देखील गुरुवारी पारा ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. भिवंडी आणि कल्याण या शहरांमध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे, बदलापूर, उल्हासनगर, तळोजा, पनवेल या शहरांमध्ये सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान कायम होतं. ठाणे शहरात ४१.८ तर मुंब्रा आणि कोपरखैरणे भागात ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. बुधवारच्या तुलनेत आज तापमानात किंचित घट झाली आहे. पण उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे ठाण्यात सलग चौथ्या दिवशी उष्णतेची लाट कायम होती. पुढील आणखी काही दिवस राज्यातील तापमान असंच चढं राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना दक्षता घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.