जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये शुक्रवार सकाळपासून विजेच्या कडकडाटासह जोरादार पावसाने हजेरी लावली आहे. तर मागील काही तासांपासून सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळे डोंबिवली तसेच ठाणे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवली शहरामध्ये सकाळपासून ९४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मागील सहा तासाच्या कालावधीत ठाणे शहरात १६.७५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा भागशाळा मैदानात वाहन कर्ज मेळावा
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अगदी मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याबरोबरच रस्त्यांवर खड्डेपडून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले होते. त्यानंतर मात्र पावसाने जिल्ह्यात पूर्ण दडी मारली होती. यामुळे यंदाच्या वर्षीच्या पाऊस गेल्याचेच चित्र स्पष्ट होत होते. असे असतानाच शुक्रवारी सकाळापासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे शहरात मागील सहा तासाच्या कालावधीत १६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर डोबिवली शहरात ९४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण या शहरांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. तर डोंबिवली आणि ठाणे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहे. अद्याप या पावसाचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसलेला नाही.