उल्हास नदीची पातळी वाढल्याने कपात रद्द; धरणक्षेत्रात पाऊस
ठाणे जिल्ह्य़ातील मोठय़ा शहरांच्या पाणीपुरवठय़ाचा मुख्य स्रोत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीतून १०० टक्के पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या शहरांवरील पाणीसंकट दूर झाले असून पाणीकपातीचे वेळापत्रक तीन दिवसांपासून रद्द करण्यात आले आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रमजानच्या काळात अतिरिक्त पाण्याची गरज भासल्यास बारवी धरणातूनही पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम प्राधिकरण, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थांनी शहरांना १०० टक्के पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे जिल्ह्य़ात पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांना जानेवारीपासून ३० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आले होते.आता जिल्ह्य़ातील नागरिकांना धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी-मुंबई, मीरा भाईंदर महापालिका आणि अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील नागरिकांची पाणीकपातीच्या संकटातून सुटका झाली आहे.
बारवीत गतवर्षांपेक्षा अधिक पाणीसाठा
ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठय़ाचे प्रमुख धरणे असलेल्या बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. १ जुलैला सुमारे १८८ मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाचा गेल्या महिनाभराचा अनुशेष भरून निघाला आहे. बारवी धरणाची पातळी रविवारी सकाळी १५.२३ टक्क्यांपर्यंत वाढली होती. गेल्या वर्षी धरणामध्ये २ जुलैला केवळ ०.८७ टीएमसी पाणी शिल्लक होते, तर यंदा ०.९७ टीएमसी पाणी आहे.
सध्या बारवी धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद असले तरी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढून मोहने बंधारा भरून पाणी खाडीत जात आहे. त्यामुळे येथून १०० टक्के पाणी उचलण्याची सूचना सर्व प्राधिकरणांना देण्यात आली आहे.
– सुभाष वाघमारे, अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, ठाणे