ठाणे / कल्याण / बदलापूर : ठाणे जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर गुरुवारी कायम होता. या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर भागातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरात सखल भागांमध्ये पाणी साचले असले तरी शहरात फारशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नव्हती. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्यात आली होती. बारवीच्या पाणलोट क्षेत्रात दोघे वाहून गेले. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला.

हेही वाचा >>>जाहीरात फलक मालक आणि अधिकाऱ्यांमध्ये भागीदारी, मनसेच्या आरोपामुळे खळबळ

चाळींमध्ये पाणी

ठाणे शहरातील वंदना सिनेमागृह, मुख्य बाजारपेठ, गोखले रोड, कोपरी, कोर्ट नाका ते खारकर आळी तसेच इतर सखल भागात पाणी साचले होते. त्याचबरोबर बाळकुम आणि पडवळनगर भागातील काही चाळींमध्ये पाणी शिरले होते. याशिवाय घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी, पातलीपाडा, वाघबीळ आणि आनंदनगर भागासह इतर सखल भागांमध्ये पाणी साचले होते. गेल्या चोवीस तासांत शहरात ३४ झाडे पडली असून या घटनेत दोन जण जखमी झालेले आहेत.

भिवंडीत फटका

भिवंडी शहरातील निजामपुरा रोड, शिवाजीनगर भाजीपाला मार्केट, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, म्हाडा कॉलनी, नजराना कंपाऊंड, तीनबत्ती येथील भाजी मार्केट या सखल भागांत पाणी साचले होते. कामवारी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

हेही वाचा >>>ठाण्यात पावसामुळे पोलिस भरती पुढे ढकलली

डोंबिवली शहरातील सखल भागात आयरे, कोपर, निळजे लोढा हेवन भागात पुराचे पाणी शिरल्याने या भागातील रहिवाशांचे हाल झाले. गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागत होते. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नदीकाठच्या अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्यातील २२ गावांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बारवीच्या पाणलोट क्षेत्रात दोघे बुडाले गुरुवारी मुसळधार पावसामुळे बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या टाकीची वाडी येथून दोन व्यक्ती वाहून गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. मुरबाडपासून आठ किलोमीटर अंतरावर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या टाकीच्या वाडी येथे हा प्रकार समोर आला.

बदलापूरमध्ये पूरस्थिती

गुरुवारी उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दुपारच्या सुमारास उल्हास नदीचे पाणी बदलापूर शहरात शिरले. बदलापूर पश्चिम येथील वालिवली, हेंद्रेपाडा, रमेशवाडी, बदलापूर चौपाटी परिसर, सोनिवली परिसरात अनेक घरांत पाणी शिरले. त्यामुळे सुमारे तीनशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग, बी केबीन रोड आणि शिवमंदिर परिसरात पाणी साचले होते. उल्हास, वालधुनी, काळू नद्यांना महापूर आल्याने या पुरांचे पाणी कल्याण डोंबिवली पालिकेच्या टिटवाळा, आंबिवली, शहाड, अटाळी, गौरीपाडा, बारावे, बैलबाजार, गोविंदवाडी, विठ्ठलवाडी परिसरात शिरल्याने शहराच्या वेशीवर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरांतर्गत रस्त्यांवर सखल भागात पाणी होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains in bhiwandi kalyan amy