तोडगा काढण्याची मच्छीमारांची राज्य शासनाकडे मागणी

समुद्रात उद्भवलेल्या वादळी परिस्थितीमुळे उत्तनजवळ मासेमारी नौका समुद्रात बुडाल्यानंतर इथला रेतीचा दांडा नावाचा वाळूचा परिसर धोकादायक बनत असल्याची बाब प्रकर्षांने समोर आली आहे. या वाळूच्या परिसरावर शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता मच्छीमार करू लागले आहेत.

समुद्रात वादळी वारे वाहू लागल्यामुळे उत्तन येथील मासेमारी नौका मंगळवारी रात्री समुद्रात उलटली. या वेळी ही नौका पाली येथे असलेल्या रेतीचा दांडा या समुद्रात असलेल्या रेतीच्या पट्टय़ामध्ये फसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या वेळी अन्य मासेमारी नोकांनी बुडालेल्या नौकेवरील खलाशांना वाचवल्याने मोठी दुर्घटना घडली नाही, परंतु असे अपघात यापुढे होऊ नयेत यासाठी या वाळूच्या पट्टय़ाबाबत शासनाने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत मच्छीमार व्यक्त करत आहेत. वसई खाडी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते, त्याच ठिकाणी हा वाळूचा पट्टा तयार झाला असून मच्छीमार त्याला रेतीचा दांडा असे संबोधतात. खाडीच्या पाण्यासोबत वाहून येणारी रेती खाडीच्या मुखाशी मोठय़ा प्रमाणावर जमा होत आहे.

..तर मार्ग बंद होईल

एरवी या भागातून ये-जा करताना मासेमारी नौका रेतीच्या दांडय़ाचा भाग सोडून इतर भागाचा उपयोग करतात, परंतु मंगळवारी वेगवान वाऱ्यामुळे आणि रात्रीच्या काळोखात रेतीच्या दांडय़ाचा अंदाज न आल्यानेच ब्लेसिंग ही मासेमारी नौका रेतीच्या दांडय़ात अडकली आणि नंतर भरतीच्या वेळी समुद्रात बुडाली. पूर्वी या भागात नियमितपणे रेती काढली जात होती. त्यासाठी महसूल विभागाकडून रेती उत्खननाचा ठेकाही दिला जात असे, परंतु गेल्या काही वर्षांपासून ठेका देण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात रेती येऊन साठत आहे. समुद्रातील रेतीचा थर वाढत असल्याने पोशाचा पीर हा मार्ग नौका घेऊन जाण्यासाठी धोकादायक बनल्याने बंद झाला आहे. परिणामी वसई भागातील नौकादेखील आता उत्तनच्या नौका असलेल्या मार्गातून सध्या ये-जा करत आहेत. परिणामी उत्तनच्या नौकांसाठी उत्तन बंदरातील जागा अरुंद झाली आहे, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. वेळीच हालचाल झाली नाही तर उत्तन पाली भागातील समुद्रातही रेतीचा थर वाढत जाऊन हा मार्गही बंद होईल आणि वसईसह उत्तन, पाली, चौक भागातील मासेमारी नौकांसाठी समुद्रात जाणेच अशक्य होईल, अशी भीती मच्छीमार व्यक्त करत आहेत.

ब्लेसिंगसुरक्षित स्थानी

बुडालेली ब्लेसिंग ही नौका किनाऱ्यावर घेणे मच्छीमारांना गुरुवारीही शक्य झाले नाही, परंतु नौका सध्या सुरक्षित ठिकाणी उभी करण्यात आली आहे. या अपघातात नौकेवरील मासेमारी जाळी खराब झाली असून नौकेवरील मासे साठवायची जागा, सुकाणू कक्ष यांचे नुकसान झाले आहे. नौकेच्या मालकाला दहा ते बारा लाखांचा फटका बसला आहे. शासनाने भरपाई द्यावी तसेच स्थानिक मच्छीमारांना जीवरक्षक जॅकेट द्यावीत, अशी मागणी स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केली आहे.

कोकणात रत्नागिरी भागात रेती काढण्याचे ठेके दिले जातात. त्यामुळे समुद्रातील रेतीची पातळी एकसमान राखली जात असते. याच धर्तीवर रेतीचा दांडा येथे जमा होत असलेल्या रेतीबाबत शासनाने सर्वेक्षण करावे आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा येथील मच्छीमारांच्या उपजीविकेचा व्यवसायच धोक्यात येईल.

बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समित