ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गिकेवर शनिवारपर्यंत दररोज मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी असेल. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. घोडबंदर मार्गावरून जड-अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्याप्रमाणात होत असते. या मार्गावर सध्या घाटकोपर ते गायमुख या मेट्रो ४च्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे. त्यामुळे या मार्गिकेवर शनिवारपर्यंत दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ४ पर्यंत खांबावर तुळई टाकल्या जाणर आहेत. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत.
असे आहेत वाहतूक बदल
प्रवेश बंद :- मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : मुंबई ठाणे येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने माजिवडा पूल येथून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. किंवा कापूरबावडी जंक्शन येथून बाळकूम, कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद : मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनाना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंदी असेल.
पर्यायी मार्ग : ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद : नाशिक येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंदी असेल.
पर्यायी मार्ग : ही वाहने मानकोली पूलाखालून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
– तुळई टाकण्याच्या ठिकाणी हलक्या वाहनांना सेवा रस्ता मार्गे वाहतूक करता येईल.