कल्याण मधील पत्रीपूल ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यानच्या रहेजा गृहसंकुला समोरील काँक्रीट रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या आठवड्यापासून सुरू केले आहे. या रस्ते कामामुळे एका मार्गिकेतून पत्रीपूल भागात वाहतूक होत असल्याने या भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन वर्षापूर्वी पत्रीपुलाच्या नवीन उभारणीचे काम सुरू असताना नागरिक दीड वर्ष या भागात वाहतूक कोंडीत अडकत होते. हा त्रास पूल उभारणीनंतर संपला. गेल्या आठवड्यापासून पत्रीपूल ते रहेजा संकुलालगतचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटच्या कामासाठी खोदण्यात आला आहे. त्यामुळे पत्रीपुलावरून वाहतूक एका मार्गिकेतून होत आहे.

हेही वाचा >>> अन्याय सहन केलात… आता लढायला सज्ज व्हा; राजन विचारे यांचं भावनिक आवाहन    

वाहनांचा चारही बाजुने भडीमार आणि एक मार्गिका यामुळे पत्रीपूल भागात दररोज एक ते दीड तास वाहतूक कोंडी होत आहे. दिवस, रात्र हा भाग कोंडीत अडकत असल्याने नागरिकांनी शिळफाटा, कल्याण पूर्व भागातून इच्छित स्थळी जाणे पसंत केले आहे. डोंबिवलीतून कल्याणला जाणारे प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत.

खराब रस्ता

शिळफाटा रस्ता काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीकडे आहे. या यंत्रणेने भिवंंडी वळण रस्ता, कोन ते दुर्गाडी ते शिळफाटा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले आहे. पत्रीपुलाजवळील काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी एक मार्गिका बंद ठेवून काम करावे लागणार असल्याने या कामाला वाहतूक विभागाकडून सण, उत्सव, परीक्षांचा हंगाम विचारात घेऊन लवकर परवानगी दिली जात नव्हती. गेल्या वर्षापासून हे काम रखडलेले आहे. येत्या पावसाळ्यात हा रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता असल्याने एमएसआरडीसीने घाईने हे काम हाती घेतले आहे.

हेही वाचा >>> कल्याण लोकसभेतील तुल्यबळ लढतीत आम्ही लढणार आणि जिंकणार पण, उबाठा पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा विश्वास

कोठे होते कोंडी

शिळफाटा रस्त्याने, डोंबिवलीतून, कल्याण पूर्वेतून येणारी वाहने पत्रीपुलावरून कल्याणमध्ये प्रवेश करताना रहेजा संकुला लगतची रस्त्याची उजवी बाजू खोदण्यात आली आहे. ही वाहने एका मार्गिकेतून कल्याणमध्ये किंवा गोविंदवाडी दिशेने निघून जातात. वाहतूक सुरू असताना पोलीस दुर्गाडी किल्ला दिशेने पत्रीपूलमार्गे शिळफाटा, डोंबिवलीत जाणारी वाहने रोखून धरतात. ही वाहने सुमारे अर्धा ते पाऊण तास अनेक वेळा रोखल्याने दुर्गाडी किल्ला दिशेने वाहनांच्या रांगा लागतात. गोविंदवाडी वळण रस्त्याची पत्रीपुलकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी सुरू केली की शिळफाटा रस्त्याने कल्याणकडे येणारी वाहतूक रोखून धरली जाते. शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या अधिक असल्याने या रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी दररोज होत आहे. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. १५ ते २० वाहतूक पोलीस, सेवकांचा ताफा याठिकाणी तैनात असतो.

कोंडीचा फटका रुग्णवाहिका, शालेय बस यांना कोंडीचा सर्वाधिक फटका बसला आहे. कल्याण पूर्व, पश्चिम भागातील अनेक विदयार्थी खासगी वाहने, शालेय बस मधून पूर्व, पश्चिमेतील शाळांमध्ये जातात. त्यांची या कोंडीने सर्वाधिक कोंडी केली आहे. आता परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्यात ही कोंडी सुरू झाल्याने पालक वर्ग अस्वस्थ आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy traffic in patri pool area in kalyan due to concrete road work zws