ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते पडघापर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून त्यात अवजड वाहतूकीमुळे भर पडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. या कोंडीबाबत नागरिकांमधून संताप होऊ लागल्यानंतर ठाणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार अवजड वाहतूकीला ठाण्यात दिवसा म्हणजेच पहाटे ५ ते रात्री ११ यावेळेत बंदी घालण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत मात्र अवजड वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. ३० ऑगस्टपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. या निर्णयामुळे मुंबई-नाशिक महामार्गाबरोबर ठाणे, भिवंडी, कल्याण शहरात होणारी कोंडी कमी होणार आहे.
गुजरात, नाशिक आणि जेएनपीटी बंदरातून ठाणे आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गे ही वाहतूक सुरू असते. रात्री १० ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते सायंकाळी ४ यावेळेत ही वाहतूक सुरु असते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे महामार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच दुपारच्या वेळेत सुरू असलेल्या अवजड वाहतूकीमुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीत नागरिकांसह शाळेच्या बसगाड्या अडकून पडत आहेत. दहा ते पंधरा मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी दिड ते दोन तासांचा अवधी लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. माजिवडा-वडपे दरम्यान होणाऱ्या दररोजच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेऊन दिवसा अवजड वाहतूकीला बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकताच मुंबई-नाशिक महामार्गाची पाहाणी करून मास्टीक पद्धतीने खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. यानंतर खड्डे भरणीच्या कामासाठी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी मोठा निर्णय घेतला असून यानुसार ठाण्यात दिवसा अवजड वाहतूकीला बंदी घातली आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील जवाहिऱ्यांला लुटणाऱ्या नणंद-भावजय अटकेत
असे आहेत वाहतूक बदल
नवी मुंबई येथून मुंब्रा बाह्यवळण मार्गे होणाऱ्या अवजड वाहतूकीला शिळफाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. मुंबई आणि नवी मुंबई मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या अवजड वाहतूकीला आनंदनगर टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिककडून येणाऱ्या अवजड वाहनांना शहापूर तर, गुजरातकडून येणाऱ्या अवजड वाहनांना मनोर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ही प्रवेश बंदी लागू असणार आहे. तर, या सर्व मार्गांवर रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत मात्र अवजड वाहतूकीला परवानगी दिली जाणार आहे. शहापूर येथून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहने सापगाव, मुरबाड, कर्जत, चौक फाटा, डि पाॅईंट, जेएनपीटी या पर्यायी मार्गे जाऊ शकतील. तसेच मनोर येथून नाशिकच्या दिशेने जाणारी अवजड वाहने मनोर, पोशेरी, पाली, वाडानाका, शिरिष पाडा, अबिटघर, कांबरे, पिवळी, केल्हे, दहागाव, वासिंद या पर्यायी मार्गे जाऊ शकतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.