डोंबिवली- रविवारी कार्यालयांना सु्ट्टी असते. त्यामुळे कल्याण-शीळफाटा रस्ता रविवारी वाहन कोंडीतून मुक्त असेल असा विचार करून घराबाहेर वाहने घेऊन बाहेर पडून शीळफाटा रस्त्याने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना काटई ते देसई गावा दरम्यान रविवारी वाहन कोंडीत अडकावे लागले. हे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकाला पाऊण ते एक तास लागत होता. उन्हाचा चटका, त्यात वाहनात रखडपट्टी त्यामुळे प्रवासी हैराण झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक रहिवासी आपली चारचाकी, दुचाकी वाहने घेऊन पनवेल, नवी मुंबई, मुंबई, ठाणे भागात असलेल्या विवाह, घरगुती समारंभांना निघाले होते. रविवारी सरकारी, खासगी कार्यालय बंद असतात. त्यामुळे कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी असते. आठवड्यातील सात दिवसात रविवारी शीळफाटा रस्ता मोकळा श्वास घेत असतो. परंतु, रविवारी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना सुट्टीच्या दिवशीही या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

काटई गावाजवळ एमएसआरडीसीकडून कल्याण-शीळफाटा रस्त्याचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. टाटा नाका ते काटई दरम्यान रस्त्याचे पाच मार्गिंकांचे पूर्ण झाले आहे. पलावा चौक ते शीळफाचा चौकापर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील कल्याण आणि ठाणे, नवी मुंबई बाजुने काटई नाका भागाकडे येणार वाहने पाच ते सहा मार्गिकांमधून सुसाट येतात. परंतु, काटई गावा जवळ रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण कामासाठी रस्त्यांचे सहा फुटांचे टप्पे करण्यात आले आहेत. एक रस्त्याचा टप्पा काँक्रीटीकरण करून पूर्ण करण्यात आला आहे.

दुसरा टप्पा पर्ण करण्यासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकावेळी पाच ते सहा मार्गिकांमधून काटई गावाकडे येणारी वाहने दोन्ही बाजुने खोळंबून राहतात. आणि अरुंद रस्त्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. या रस्त्याच्या काटई नाका, काटई पूल, पलावा चौकात वाहतूक पोलिसांची फौज वाहतूक नियोजनाचे काम करत आहे. परंतु, एकेरी मार्गिका आणि शेकडो वाहने एकावेळी काटई गावाजवळ येत असल्याने ही वाहने प्रत्येक मार्गिकेत थांबवून एकेक मार्गिकेवरील वाहने पुढे सोडण्याचे काम वाहतूक पोलीस करत आहेत. एक मार्गिका वरील वाहने सोडताना दुसऱ्या मार्गिकेत दोन किमीच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.

हेही वाचा : सिक्किममधील भीषण अपघातात ठाण्यातील एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मृत्यू

कामे सुरू असलेल्या ठिकाणी बाजुला पेट्रोल पंप, ढाबे आहेत. या ठिकाणाहून बाहेर पडणारी वाहने मुख्य मार्गिकेत लागेपर्यंत सरळ मार्गाने येणारी अडकून पडतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. दररोज सकाळ, संध्याकाळी काटई गावाजवळील रस्ते वाहन कोंडीत अडकत आहेत. रविवारीही या कोंडीचा फटका वाहन चालक, प्रवाशांना बसला. शहर परिसरातील डोंगर, गाव परिसरात पर्यटनासाठी निघालेले रहिवासी या कोंडीत अडकून पडले होते. पावसापूर्वी हा रस्ता पूर्ण करा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी रस्ते कामामुळे ही कोंडी होत असल्याचे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy traffic jam on kalyan shilphata road passengers stuck for long time pbs