डोंबिवली – तप्त उन्हामुळे मागील दीड महिन्यांपासून वातावरण करपून गेले आहे. रस्त्यावर फिरताना, घरात राहुनही उष्णतेमुळे अंग भाजून नागरिक हैराण झाले आहेत. अशा अस्वस्थ परिस्थितीत शनिवारी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अचानक हलक्या अवेळी पावसाने हजेरी लावली. वातावरणात थोडा गारवा आल्याने नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.

शुक्रवारी दिवसभरच्या कडक उन्हाने नागरिक हैराण होते. वारा नाहीच, पण वाऱ्याची झुळुकही पसार झाली होती. अशा अस्वस्थेत नागरिक शनिवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना डोंबिवली शहराच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. घरातील पंखे, वातानुकूलित यंत्रे बंद झाल्याने नागरिक वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत होईल याची वाट पाहत मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराबाहेर, काही जण गच्चीवर, रस्त्यावर उभे होते.

यावेळी अचानक मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा दरवळ सुरू झाला. आजुबाजुला कोठे तरी पाऊस पडत आहे, असा विचार नागरिक करत होते. त्यावेळी गारव्याच्या शोधात असलेल्या नागरिकांच्या समोरच अवकाळी पावसाने सुरूवात केली. आकाश पावसाच्या ढगांनी काळेभोर झाले होते. आता पाऊस कोसळणार असा अंदाज नागरिक वर्तवत होते.

अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वीज गेल्याने घरात बिछान्यावर पडून असलेली लहान मुलेही झोपमोड करत पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडली. नागरिक, मुले, महिला मध्यरात्रीची वेळ असुनही पावसात भिजण्याचा आनंद घेत होती. झाडांवर घरट्यांमध्ये बसलेल्या पक्षी, पिल्लांचा अवेळी पावसामुळे कलकलाट सुरू झाला.

पावसाने मुसळधार पडावे, अंगाची काहिली शांत करावी, अशी मागणी नागरिक करत होते. परंतु, अवेळी पावसाने सरीसारखी हजेरी लावली. सुरूवातीला जोर असलेला पाऊस नंतर रिमझिम ठिबकत राहिला. अर्धा तास पावसाने हजेरी लावली. पण त्यानंतर वातावरणात थोडा गारवा आला. गेलेला वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत झाला होता. पाऊस आणि वीज आल्याने नागरिक समाधानी झाले होते.

मराठवाड्याच्या उत्तर भागापासून ते मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यानंतर आकाशात बाष्पयुक्त ढगांचे पुंजकेच्या पुंजके येताना दिसत होते.