ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू असल्याने १८ एप्रिलपर्यंत रात्री १२ ते पहाटे ५ यावेळत ठाणे वाहतूक शाखेने या मार्गावर जड अवजड वाहनांना बंदी लागू केली आहे. अवजड वाहनांची वाहतूक चिंचोटी, अंजुरफाटा मार्गे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या पर्यायी मार्गावर रात्री वाहनांचा भार वाढणार आहे.
गुजरात येथून हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे उरण जेएनपीटीच्या दिशेने वाहतूक करत असतात. गेल्याकाही वर्षांपासून घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेचे काम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून कासारवडवली ते गायमुख येथे १८ एप्रिलपर्यंत तुळई उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी असणार आहे. १८ एप्रिलपर्यंत दररोज रात्री १२ ते पहाटे ५ यावेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.
वाहतूक बदल पुढील प्रमाणे
प्रवेश बंदी
- गुजरात, वसई, विरार, बोरीवली येथून घोडबंदर मार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंदी असेल.
हेही वाचा – ठाण्यात संस्थांना नाले दत्तक देण्याची योजना राबवा; भाजपा आमदार संजय केळकर यांची मागणी
पर्यायी मार्ग
- गुजरात, मुंबई, विरार, वसई येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजुर फाटा, माणकोली भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
- जड अवजड वाहने वगळता इतर वाहने आनंदनगर सिग्नल, सेवा रस्ता, पुढे मुख्य मार्गावरून इच्छित स्थळी जातील.