ठाणे : घोडबंदर येथील गायमुख मेट्रो मार्गावरील गर्डर उभारणीच्या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. ८ ते २० जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. तसेच या मार्गावरील इतर वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, नाशिक च्या दिशेने अवजड वाहनांची वाहतुक सुरू असते. ही वाहने घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने जातात. या वाहनांना दुपारी आणि रात्रीच्या वेळेत वाहतूकीस मुभा आहे.
या मार्गावर सध्या मेट्रो मार्गिका निर्माणाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर मेट्रो स्थानक उभारणीचीही कामे सुरू आहेत. अशाचप्रकारे गायमुख येथील मेट्रो स्थानक उभारणीचे काम सुरू असून त्याठिकाणी गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावर कोंडी होण्याची भिती व्यक्त होत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ८ ते २० जानेवारी या कालावधीत रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूकीला बंदी घातली आहे. नागलाबंदर सिग्नल ते इडियन ऑईल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा याठिकाणी हे वाहतूक बदल लागू करण्यात आलेले आहेत. या मार्गावरील इतर वाहनांची वाहतूक बाजूच्या सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.