लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : विनाहेल्मट दुचाकी चालविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात असतो. या कारवाईमुळे अनेकदा पोलीस आणि चालकांमध्ये वाद होतात. परंतु आता राज्य वाहतुक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दुचाकीवर विनाहेल्मेट चालकासह त्यासोबत विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशावरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने आता पोलीस आणि दुचाकीस्वारांमध्ये वाद वाढण्याची चिन्ह आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रातही हा निर्णय लागू असून लवकरच पोलिसांकडून कारवाईबाबत मोहीम राबविण्यात येणार आहे. विना हेल्मेट चालकाला एक हजार रुपये आणि त्यासोबतच्या प्रवाशालाही एक हजार रुपये दंड आकरण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

आणखी वाचा-७० गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी अटकेत

राज्यात मागील पाच वर्षामध्ये रस्ते अपघातांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झालेली आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार आण त्यांच्या पाठीमागे असलेला सह प्रवासी यांचे अपघातात जखमी किंवा मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण अधिक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, विना हेल्मेट आणि त्याच्यासोबत सह प्रवाशाने हेल्मेट वापरले नसल्यास त्यावर कायदेशीर कारवाईचे नियम आहेत. गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे वाहतुक पोलिसांकडून ई- चलान यंत्राद्वारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात कारवाई केली जाते. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत पोलिसांकडून केवळ विना हेल्मेट वाहन चालकाविरोधात कारवाई केली जात होती. परंतु आता त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या सहकाऱ्याविरोधातही दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहे. तसेच ई – चलान यंत्रांमध्ये कलम १२९/१९४ (ड) मोटार वाहन कायद्यांतर्गत एकाच पद्धतीने कारवाई केली जात होती. परंतु आता यंत्रांमध्ये बदल करून दोन्ही पद्धतीने कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे आता ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात कारवाई केली जाणार आहे.

आणखी वाचा-ठाण्यातील पदपथ फेरीवाल्यांना आंदण, सायंकाळच्या वेळी पदपथावरून चालणे अवघड

ठाणे जिल्ह्यात आजही अनेक भागात विना हेल्मेट दुचाकी चालविण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहतुक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यास अनेकदा चालक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद उद्भवितात. त्यामुळे आता पोलीस आणि चालकांमध्ये वादाचे प्रसंग वाढण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmets are also mandatory for those sitting on back of two wheeler mrj