शिष्यवृत्ती देण्याच्या कल्पनेचा पहिला उगम एका दु:खद घटनेतून घडला. २००७ मध्ये आमच्या बँकेतील एक सीनिअर क्लार्क सुशील धुरू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले. मागे पत्नी, सातव्या इयत्तेत शिकणारी एक मुलगी-शर्वरी आणि प्रथम वर्गात शिकणारा एक मुलगा-शार्दूल आणि त्याचे वृद्ध वडील. पत्नी डोंबिवलीतील एका खासगी कंपनीमध्ये तुटपुंज्या पगारावर काम करत होती. कौटुंबिक निवृत्तिवेतन चार हजार रुपये मिळायचे. प्रयत्न करूनही श्रीमती धुरू यांना बँकेत नोकरी मिळवून देता आली नाही. धुरू यांच्या मुलांचे शिक्षण, कौटुंबिक उदरनिर्वाह या सर्वाचा प्रश्न उभा राहिला. दोन मित्रांना ही परिस्थिती सांगितली. त्यांनी दोन्ही मुलांची बँक खाती उघडण्यास सांगितले आणि दरमहा दोन्ही मुलांचा खर्च भागेल एवढी रक्कम खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली. पुढे शर्वरीला महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची वेळ आली तेव्हाही त्यांनी तिला पूर्णपणे अर्थसाह्य़ करण्याची हमी दिली. नुकतीच ती सी.पी.टी. परीक्षाही उत्तीर्ण झाली. सध्या ती प्रथम वर्ष कॉमर्स आणि टी.पी.सी.सी.चाही अभ्यास करीत आहे. सी.ए. होण्याचे तिचे स्वप्न निश्चित साकार होईल. शार्दूल आठवीचे शिक्षण घेत आहे. या कुटुंबाशी नीट परिचय नसतानाही सात वर्षांपासून दोन व्यक्ती त्यांच्यामागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. हे मनाला खूपच समाधान देणारे आहे आणि त्यातून एक कुटुंब स्वाभिमानाने परिस्थितीवर मात करू शकले. कोणतेही ओशाळलेपणा नाही, कारण देणारे हातच अज्ञात आहे. याच उदाहरणातून पुढे अशा अनेक कुटुंबांना मदत करणे शक्य झाले.
रायगड जिल्ह्य़ातील सातवड येथील माध्यमिक विद्यामंदिरात शिकणारे वैभव अमृत पालकर आणि गौरी जोशी यांनी २००९मध्ये उत्तम गुण मिळवून डिप्लोमासाठी प्रवेश मिळवला आणि शिक्षणही पूर्ण केले. गौरी सध्या नोकरी करत आहे, तर वैभव पुण्यातील एम.आय.टी. महाविद्यालयात डिग्रीचे शिक्षण घेत आहे. या दोघांचेही शिक्षण अशाच दानशूरांमुळे पूर्ण झाले.
असेच आणखी एक उदाहरण. रातवड शाळेतील राकेश पडवळ, उसर शाळेतील सागर तांबडे आणि माणगावच्या भोपळे-पेण शाळेतील चेतन मोंडे या तिन्ही विद्यार्थ्यांना दहावीत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. या तिघांनाही पुढे डिप्लोमा शिक्षणासाठी एकाच देणगीदाराने दरमहा दोन हजार रुपयांची मदत केली. त्या वेळचा हा प्रसंग. २०१२मध्ये राकेशने पत्र लिहून कळवले की, गेल्या वर्षी मिळालेल्या २४ हजार रुपयांपैकी १३ हजार शिल्लक असल्याने यावर्षी केवळ ११ हजार पाठवावे. ते पत्र आजही माझ्या संग्रही आहे.
अज्ञात दात्यांकडून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर करण्याची शिस्त या सर्वच मुलांना लावून देण्यात आली होती. दरमहा मुलांनी दीड ते दोन हजार रुपयेच खात्यातून काढणे अपेक्षित असते. योग्य कारणाशिवाय ५-१० हजार रुपये काढल्यास पुढील वर्षी शिष्यवृत्ती मिळणार नाही, याची जाणीव त्यांना सुरुवातीलाच करून दिली जाते.
राकेश आणि सागर सध्या डिग्रीचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत, तर चेतनने दोन वर्षांसाठी नोकरी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कामाचा अनुभव घेऊन डिग्री पूर्ण करण्याचा त्याचा मनोदय आहे. एका खेडेगावातील मुलगा एवढा विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतो, याचे कौतुक करावेसे वाटते. रातवड शाळेचे महादेव जाधव सर, उसर शाळेचे फूलसागर सर या मुलांचे शिक्षक होतेच, नंतर पालकही झाले. त्यामुळेच माझ्यासारख्याला आणि देणगीदारांना पसे योग्य ठिकाणी खर्च झाल्याचा विश्वास देणे शक्य होते.
ठाण्याच्या बेडेकर पॉलिटेक्निकल महाविद्यालयातील प्रा. कीर्ती आगाशे यांनी २०१२ मध्ये अशाच दोन हुशार मुलांचा संदर्भ मला दिला. डिप्लोमाचे शिक्षण या मुलांनी पूर्ण केले होते, पण डिग्रीच्या शिक्षणाचा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. त्यापैकी प्रियांका फाळके हिच्या आईला भेटायला गेलो तेव्हा ‘तीन वर्षांची जबाबदारी घेणार असाल तर डिग्रीला प्रवेश घेऊ, अन्यथा याचा आम्ही विचारही करू शकणार नाही’, असे त्या म्हणाल्या. मी त्यांना आश्वस्त केले. त्यांच्याकडे आíथकदृष्टय़ा मागास असल्याचे प्रमाणपत्र होतेच. त्याआधारे पहिल्या वर्षांची अर्धी फी परत मिळेल व त्यात उरलेले पैसे टाकून दुसऱ्या वर्षांची फी भागवता येईल, असे मी सुचवले. पण दुसऱ्या वर्षीही पूर्ण फी भरावी लागली. एकाच देणगीदाराने प्रियांका आणि परेश पाटील या दोघांचाही खर्च केला.
परेशला ओबीसी प्रमाणपत्रामुळे अर्धीच फी भरावी लागली. तेव्हा तिने मला फोन करून ‘या पैशांचे काय करू’, अशी विचारणा केली. मी तिला दोन विद्यार्थ्यांची नावे देऊन त्यांच्या नावे धनादेश देण्याचा सल्ला दिला. खरंतर तिच्या मनात आलं असतं तर तिने प्रामाणिकपणे फोनही केला नसता. कदाचित तिलाच या पैशाचा उपयोग होईल, हा विचार डोक्यात आला नि तिला पुन्हा फोन करून तशी विचारणा केली, पण तिने नकार दिला. ‘तुम्ही हे पैसे इतर विद्यार्थ्यांनाच द्या’, असे तिने ठामपणे सांगितले. वस्तुत: प्रियांकाचे कुटुंब सहा बाय सात फूट खोलीत राहते.
धाकटी बहीण ‘बँकिंग इन्शुरन्स’मध्ये पदवी पूर्ण करत आहे. तिच्या शिक्षणाचाही खर्च आहे, पण तिने त्यासाठी मदत मागितली नाही. परेश पाटील जांभूळपाडय़ात राहणारा. दत्ता मेघे कॉलेजला प्रवेश मिळाला. रोज गावाहून भिवंडी, भिवंडीहून ठाणे, ठाण्याहून ऐरोली असा प्रवास करतो, पण अधिक मदतीची की अपेक्षा नाही. आज समाजावर अवलंबून असलेली ही दोन कुटुंबे स्वत:च्या पायावर उभी राहतीलच; पण आणखी काही कुटुंबांना मदतही करतील, अशी आशा आहे.
रवींद्र कर्वे
सेकंड इनिंग : घेणाऱ्या हातांची शिस्त
शिष्यवृत्ती देण्याच्या कल्पनेचा पहिला उगम एका दु:खद घटनेतून घडला. २००७ मध्ये आमच्या बँकेतील एक सीनिअर क्लार्क सुशील धुरू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले.
First published on: 11-02-2015 at 12:26 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help family in difficult financial times