लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महापालिकेने मदत क्रमांक सुरू केला आहे. ८६५७८८७१०१ असा हा व्हॉट्सॲप मदत क्रमांक असून या क्रमांकावर नागरिक व्हॉट्सॲपद्वारे तक्रारीचे छायाचित्र पाठवू शकतात.
हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्यानुसार महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. नागरिकांनाही अनेकदा हवा प्रदूषणाची प्रकरणे आढळून येत असतात. परंतु तक्रारी कुठे कराव्या असा प्रश्न नागरिकांना पडत असतो. त्यामुळे ठाणे महापालिकेने मदत क्रमांक सुरू केला आहे.
आणखी वाचा-“फुसका बार वाजलाच नाही”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
उघड्यावर कचरा जाळणे, बांधकाम होत असताना परिसरात धूळ पसरणे, रस्त्यावरील बांधकामाचा राडारोडा विना- आच्छादन वाहतूक करणे, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे धुळीचे प्रदूषण, बांधकामाचा राडारोडा, कचरा इतरत्र फेकला जाणे, उपाहारगृहातून धुराचे प्रदूषण, रसायनांचा येणारा उग्र दुर्गंधी अशा अनेक तक्रारी नागरीक ८६५७८८७१०१ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे छायाचित्रासह नोंदवू शकतात. महापालिका प्रशासनातर्फे त्या तक्रारीची पडताळणी करून कारवाई केली जाईल. त्यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. फटक्यांसंदर्भात आलेल्या तक्रारी कारवाईसाठी पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहेत.