डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली खंबाळपाडा भागातील उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर उभारलेली चार माळ्याची बेकायदा इमारत कल्याण डोंबिवली पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने भुईसपाट केली.ही बेकायदा इमारत खंबाळपाडा येथील अधिकृत शंकेश्वर व्हिला इमारतीच्या बाजुला असलेल्या पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बांधकामधारक चेतन माळी यांनी उभारली होती. पालिकेच्या फ प्रभागाच्या तत्कालीन साहाय्यक आयु्क्तांनी ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित करून बांधकामधारक चेतन माळी यांना स्वताहून ही इमारत काढून घेण्याचे आदेश दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माळी यांनी ही इमारत स्वत: पाडली नाही. खंंबाळपाडा येथे महापालिकेच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे याची माहिती समजल्यावर साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी बांधकामधारक चेतन माळी यांना नोटीस बजावली. आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारतीचे बांधकाम केले म्हणून साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या निर्देशावरून अधीक्षक जयवंत चौधरी यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात चेतन माळी यांच्या विरूध्द एमआरटीपीचा गु्न्हा दाखल केला.

प्रभागात रिकाम्या बेकायदा इमारती असतील तर त्या प्राधान्याने तोडा असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश आहेत. दिलेल्या मुदतीत इमारत पाडली गेली नाही. त्यामुळे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही बेकायदा इमारत रहिवास मुक्त असल्याने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून भुईसपाट केली. या कारवाईमुळे या परिसरात बेकायदा इमारतींचे उभारणी करणारे भूमाफिया अस्वस्थ झाले आहेत.

खंबाळपाडा परिसर आखीव रेखीव पध्दतीने गृहसंकुलांनी विकसित झाला आहे. आपल्या भागासाठी राखीव असलेल्या उद्यानाच्या आरक्षणावर भूमाफियांनी बेकायदा इमारत उभारल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी कोणत्याही दबावाला न झुकता आयुक्तांच्या आदेशावरून जेसीबी, शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने ही बेकायदा इमारत भुईसपाट केली. पालिकेने या भूखंडाला तातडीने संरक्षित भींत घालून हा भूखंड संरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

खंबाळपाडा येथे यापूर्वीच चार माळ्याची उद्यानाच्या आरक्षणावर बेकायदा इमारत विकासक चेतन माळी यांनी उभारली होती. ही इमारत अनधिकृत घोषित होती. ही इमारत विकासकाला स्वताहून तोडून टाकण्याची नोटीस देऊनही त्यांनी ती तोडली नाही म्हणून पालिकेने ही बेकायदा इमारत जमीनदोस्त केली आहे. हेमा मुंबरकर साहाय्यक आयुक्त,फ प्रभाग.