कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहरात पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलं आहे. मागच्या दहा ते पंधरा वर्षात कल्याण डोंबिवली मध्ये अनेक मोठे प्रकल्प आकाराला आले आहेत. लाखो रुपये खर्च करून नागरिक मोठ्या आशेने या ठिकाणी घर खरेदी करताना दिसतात मात्र प्रत्यक्षात काही दिवसांनी नागरिकांचा हिरमोड होतो. याचं कारण ठरतंय नागरिकांना सतावणारी पाण्याची समस्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिजन्सी अनंतमचे नागरिक पाणी टंचाईमुळे हैराण

डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी अनंतम या मोठ्या गृहसंकुलात देखील पाणीटंचाईने रहिवासी हैराण झाले आहेत. रविवारी सकाळी पाणीटंचाई विरोधात इथले रहिवासी अखेर रस्त्यावर उतरले आणि आंदोलन केलं. यावेळी रहिवाशांनी संबंधित विकासकाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र विकासकाच्या बाऊन्सर्सनी या रहिवाशांना अडवलं. त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यापूर्वी देखील पाणीटंचाईमुळे इथल्या रहिवाशांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती आता पुन्हा पाणीटंचाई निर्माण होत असल्याने रहिवासी चांगलेच संतापले आहेत.

बिल्डरच्या भूमिकेवर रहिवाशांनी व्यक्त केली नाराजी

बिल्डरच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसंच पाणीपुरवठा करण्याविषयी बिल्डरने लेखी आश्वासन द्यावे अशी आग्रही भूमिका रहिवाशांनी घेतली. आम्ही घर विकत घेताना विकासकाने आम्हाला अनेक आश्वासनं दिली होती. प्रत्यक्षात पाण्यासाठी मुलभूत गरजही पूर्ण झालेली नाही अशी तक्रार नागरिकांनी केली. नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

हे पण वाचा- डोंबिवलीचं ‘धगधगतं’ वास्तव; टाईमबॉम्बच्या वातीवर वसलेलं शहर!

तर आम्ही रस्त्यावर बसू रहिवाशांचा इशारा

रिजन्सी अनंतम या भव्य गृहसंकुलात विविध इमारतींमध्ये जवळपास ४ हजार नागरिक राहत आहेत त्यातील जवळपास अडीच ते तीन हजार नागरिक रविवारी पाणी प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले होते. बाऊन्सर्सनी आपल्याला काही प्रमाणात धक्काबुक्की केली असाही आरोप रहिवाशांनी केला. अखेर काही वेळानंतर विकासक आणि रहिवासी यांच्यामध्ये चर्चा झाली यावेळी आरोप-प्रत्यारोपही झाले. विकासकांकडून एमआयडीसी कडे बोट दाखवण्यात आलं असं नागरिकांकडून सांगण्यात आलं मात्र आम्ही एमआयडीसी कडे नाही तर बिल्डरांकडे बघून घरं घेतली अशी उत्तरं नागरिकांनी यावेळी विकासकांना दिली. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात यावर काय तोडगा निघतो ते पाहावं लागेल. मात्र यावर लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही रस्त्यावर बसू असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.


विकासक संतोष डावखरे काय म्हणाले?

रिजन्सी अनंतम मध्ये तीन ते चार विकासक एकत्र आहे त्यापैकी एका बिल्डरने माध्यमांना प्रतिक्रिया देत आपलं म्हणणं मांडलं आहे. “रिजन्सी अनंतम प्रोजेक्ट हॅन्ड ओव्हर करून अडीच ते तीन वर्षे झालेली आहे. लोकांच्या रिक्वायरमेंट पेक्षा आम्ही जास्त पाणीपुरवठा एमआयडीसी कडून मंजूर करून घेतला आहे. एमआयडीसी कडून सुरळीत पाणीपुरवठा सुरू होता मात्र गेल्या एक दीड महिन्यापासून सर्व्हिसिंग आणि इतर कारणांमुळे एमआयडीसी कडे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे लोकांना त्रास होतो आहे”, असं विकासक संतोष डावखरे यांनी सांगितलं. “पाणीपुरवठा लवकर सुरू होईल असं आश्वासन सुद्धा अधिकारी देत आहेत. जेवढा पाणीपुरवठा आम्ही मंजूर केला होता त्यापैकी २५ ते ३० टक्केच पाणीपुरवठा ते देऊ शकत आहेत. नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत असल्यामुळे नागरिक आमच्याकडे आले होते. शनिवार रविवार एमआयडीसीचे कार्यालय बंद असतात त्यामुळे नागरिक आमच्याकडे आले. असं विकासकांनी सांगितलं. पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमीच पाठपुरावा करत असून आमचे प्रयत्न सुरूच आहे” असं डावखरे यांनी स्पष्ट केलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High profile housing complex project in dombivali faces water crisis people who bought houses disappointed rno news scj
Show comments