ठाणे : नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर परिसरात विविध प्रकल्पांसह उच्च तंज्ञशिक्षण, वैद्यकीय, डिजीजल विद्यापीठांची उभारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यानुसार अर्बन फाॅरेस्ट पार्क, आध्यात्मिक सुविधा केंद्र या प्रकल्पांसह आयटीसी, एआयआयएमस, डिजीटल विद्यापीठांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने जागा आरक्षण फेरबदलांचा प्रस्ताव तयार करून त्यावर नागरिकांकडून हरकती व सुचना मागविल्या आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकरण झाले आहे. शहराची लोकसंख्या २८ लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या काही वर्षात शहरात सेंट्रल पार्क, खाडी किनारा सुशोभिकरण, उड्डाण, रस्ते बांधणी, सुशोभिकरण अशा विविध प्रकल्पांची उभारणी झाली आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत पालिका प्रशासनाने विविध प्रकल्पांची उभारणी करत शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. गेले अनेक वर्षे कागदावर असलेल्या मनोरंजन (ॲम्युजमेंट पार्क) आणि हिमोद्यान (स्नो पार्क) प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करून हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. कोलशेत भागात टाऊन पार्कची उभारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून या पार्कमध्ये मत्स्यालय, तारंगण, विज्ञान केंद्र आणि सेंद्रीय वनस्पती प्रकल्प यांचा समावेश असणार आहे. यासाठी पालिकेने काही दिवसांपुर्वी जागा आरक्षण फेरबदलांचा प्रस्ताव तयार केला. त्यापाठोपाठ आता घोडबंदर परिसरात विविध प्रकल्पांसह उच्च तंज्ञशिक्षण, वैद्यकीय, डिजीजल विद्यापीठांची उभारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

हे ही वाचा…ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे काटेरी मुकुट कोण पेलवणार? ठाणे पोलीस दलात चर्चांना उधाण

घोडबंदर येथील मोघरपाडा आणि कावेसर भागात पायाभुत सुविधा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यात येत आहेत. तसेच घोडबंदर परिसराचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षण, डिजीटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण सुविधा यासह अध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी नियोजित ४० मीटर रुंद खाडी किनारी मार्गालगत परिसरात अनुषंगीक वापर असलेली आरक्षणे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. तसेच ठाणे शहराच्या मंजुर विकास आराखड्यामध्ये वडवली येथील शॅलो वाॅटर पार्क, हरित विभाग आणि कावेसर येथील अप्पुघर, हरित विभाग हे आरक्षण बदलून तिथे अर्बन फाॅरेस्ट पार्क, इन्स्टिट्युट ऑफ केमीकल टेक्नालाॅजी, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स, डिजीटल विद्यापीठ, सांस्कृतिक केंद्र, आध्यात्मिक सुविधा केंद्र असे आरक्षण करण्यात येणार आहे. तसेच मोघरपाडा येथे हरित विभागाच्या जागेवर वाहनतळाचे आरक्षण करण्यात येणार आहे. या आरक्षण फेरबदलाच्या प्रस्तावाबाबत नागरिकांच्या हरकती आणि सुचना मागविण्यात आलेल्या असून त्यासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे.