डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर समोरील परिसरात रविवारी संध्याकाळी मेंढ्यांच्या झुंजी खेळविण्यामध्ये उच्चशिक्षित तरूणांसह इतर नागरिकांचा सहभाग आढळून आल्याने टिळकनगर पोलिसांनी ३० जणांच्या विरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. दहा जणांना पोलिसांनी ताब्यात देऊन त्यांना समजपत्र दिले आहे. तर उर्वरित ३० जण पळून गेले.

पळून गेलेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत. धक्कादायक म्हणजे डोंबिवलीत या मेंढ्यांच्या झुंजी खेळविण्यासाठी आणि बघण्यासाठी पुण्यातील कोंढवा, जोगेश्वरी, मालाड, वडाळा, अंधेरी भागातील उच्चशिक्षित तरूण, व्यावसायिक, नोकरदार सहभागी झाले होते. एक जण उच्चशिक्षित अभियंता, माशांची शेती करणारा, एक कापड दुकानदार, एका विमान कंपनीच्या सेवेते सुरक्षा रक्षक असा नोकरदार वर्ग या खेळांमध्ये सहभागी झाला होता. भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५(३) अन्वये दहा जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

टिळकनगर पोलीस ठाण्यातील हवालदार विजेंद्र नवसारे यांनी मेंढ्यांच्या झुंजी खेळातील ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारीत हवालदार नवसारे यांनी म्हटले आहे, की शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर समोरील जागेत ३० जण दोन मेंढ्यांच्या झुंजी लावण्याची स्पर्धा खेळत होते. या मेंढ्यांच्या झुंजी लावताना दोन्ही गटाकडून आपल्या मेंढ्या जिंकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात होते. मेंढ्या झुंजींना शासनाची बंदी आहे. हे माहिती असुनही या झुंजी खेळविल्या जात होत्या. या झुंजी खेळताना एखाद्या मेंढ्याला दुखापत झाली. त्याचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी कोणाची. असाही प्रश्न निर्माण झाला होता.

या मेंढ्यांच्या झुंजीचा खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पाचहून अधिक नागरिकांना एकत्र येण्यास पोलिसांचा मनाई आदेश आहे. झुंजींसाठी पाचहून अधिक नागरिकांना एकत्र आणून पोलिसांच्या मनाई आदेशाचा भंग केला. मेंढ्यांच्या झुंजीवर बंदी असताना त्या झुंजी लावून शासन आदेशाचे उल्लंघ केले म्हणून पोलिसांनी एकूण ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या झुंजीची माहिती मिळताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक आर. वाय. चौगुले यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी सोनारपाडा भागात बैलांच्या झुंजी लावणाऱ्या दोन्ही गटातील बैल मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. बैल, मेंढे, कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर धनाढ्य लोक मोठा सट्टा खेळतात. मोठी उलाढाल या कालावधीत काही धनाढ्य करतात. या सट्टा बाजारामुळे या झुंजी पोलिसांना अंधारात ठेऊन खेळण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. समाज माध्यमांवर हे प्रकार उघड होऊ लागल्याने पोलिसांचे काम हलके होत आहे.

Story img Loader