लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात गोळीबार झाला कसा. पोलीस ठाण्याच्या आवारातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात हिलाईन पोलीस कोठे कमी पडले, अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती ठाण्यातील एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर दिली.
हा विषय पोलीस खात्यांतर्गत चौकशीचा असल्याचे या उच्चपदस्थाने सांगितले. हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात अंबरनाथ तालुक्यातील व्दारली येथील एकनाथ जाधव यांच्या जमिनीवरून गेल्या बुधवार पासून धुसपूस सुरू होती. आमदार गायकवाड यांच्या अधिकारात असलेल्या जमिनीवर त्यांना ताबा मिळू नये म्हणून स्थानिकांना भडकवून महेश गायकवाड हे प्रकरण चिघळवित होते, हे आमदार गायकवाड यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे.
आणखी वाचा-कल्याण : जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा
हे चिघळणारे प्रकरण अतिशय संयमाने हाताळण्याची जबाबदारी हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची होती. परंतु, येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल जगताप हे या पोलीस ठाण्यात नवीन आणि प्रभारी असल्याने त्यांनी राजकीय परिस्थितीचा अंदाज न घेता आमदार गणपत गायकवाड यांच्या बांधकाम व्यावसायिक कंंपनीकडून आलेला गुन्हा होणाऱ्या परिणामांचा विचार न करता दाखल करून घेतला. याप्रकरणात शिवसेनेचे महेश गायकवाड यांना आरोपी करण्यात आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर महेश गायकवाड समर्थक, व्दारतील ग्रामस्थांसह हिललाईन पोलीस ठाण्यात जमावाने आले. जमावाने आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव यांना बेदम मारहाण केली. या घटनेने अस्वस्थ आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळीबार केला.
चौकशीचा फेरा
या परिस्थितीचा अंदाज घेऊन हिललाईनच्या वरिष्ठांनी तातडीने आवश्यक बंदोबस्त वाढविण्यासाठी काय उपाय योजना केल्या. एकमेकांचे आक्रमक प्रतिस्पर्धक एकाच दालनात बसविले तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार त्यांनी का केला नाही. दोन कट्टर विरोधक एका दालनात बसविताना तेथे दोन पोलीस अधिकारी, पुरेसे पोलीस वरिष्ठ अधिकारी जगताप यांनी का तैनात ठेवले नाही. महेश यांच्यासह ७० ग्रामस्थांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची घाई हिललाईन पोलिसांनी का केली. हा दाखल गुन्हा बाहेर येणार नाही याची खबरदारी का घेतली. गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड गोळीबार करत असल्याचे सोयीचे सीसीटीव्ही चित्रण घटनेनंतर काही तासात बाहेर का आले. हे चित्रण गोपनीयतेचा भाग असताना पोलिसांनी तत्परतेने बाहेर का काढले. आमदार गायकवाड यांच्या मुलाला महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी पोलीस ठाणे आवारात बेदम मारहाण केली. ते चित्रण का दाबून ठेवण्यात आले,असे अनेक प्रश्न या चौकशीच्या दरम्यान उपस्थित केले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. उच्चपदस्थ, स्थानिक अधिकारी याविषयी प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.